Pimpri : ‘आयटीआय’साठी ३० पर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iti

Pimpri : ‘आयटीआय’साठी ३० पर्यंत मुदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरीा : दहावीचा निकाल या वर्षी चांगला लागला आहे, तरीहीदेखील आयटीआय प्रवेशाच्या जागा भरल्याची वस्तुस्थिती आहे. परिणामी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून पुन्हा एकदा मुदत देण्यात आली आहे. आता आयटीआयच्या उर्वरित जागांवर ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेण्यात येणार आहे. शहरात सद्यःस्थितीत आयटीआयच्या ७० ते ८० टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत.

शहरात पाच औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत प्रवेशाला अल्पप्रतिसाद मिळत चालला आहे. त्यामुळे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायाच्यातर्फे थर्ड शिफ्टमधील बॅचेसना तुकड्यांना प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. प्रवेशाची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली. दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन नव्याने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेश अर्ज शुल्क भरण्याच्या सुविधेला मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

अशी होईल समुपदेशन फेरी

गुणवत्ता यादी १६ नोव्हेंबर जाहीर केली आहे. नव्याने अर्ज केलेल्या उमेदवारांना १७ नोव्हेंबरपासून अधिकृत वेबसाइटवरील ‘नोटिफिकेशन’मध्ये दिलेल्या प्रवेश वेळापत्रकाप्रमाणे संबंधित संस्थेत संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक आणि नोंदणीकृत उमेदवारांना १९ ऑक्टोबर रोजी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व्यक्तीगत उपस्थित राहून समुपदेशन फेरीसाठी हजेरी नोंदवावी लागणार आहे. या उमेदवारांची हजेरी दुपारी एक वाजेपर्यंत वेबसाइटवर नोंदविली जाणार आहे. याचवेळी गुणवत्ता यादी तयार करून प्रकाशित केली जाणार आहे. तयार केलेल्या यादीनुसार उमेदवारांना समुपदेशनासाठी बोलावण्यात येणार आहे.

यादीनुसार जागांचे वाटप

प्रवेशासाठी उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवारांची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप केले जाणार आहे. मूळ कागदपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश निश्चित केला जाईल. उमेदवारांनी त्याच दिवशी प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा दुसऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुली केली जाणार आहे. दरम्यान, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश ७ सप्टेंबरपासून सुरू झाले असून ३० नोव्हेंबर २०२१ ही प्रवेशाची शेवटची तारीख आहे.

गेल्या वर्षी प्रवेश क्षमतेच्या तुलनेत जवळपास ७०-७५ टक्के प्रवेश झाले होते. आता जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आणखी ४-५ टक्के प्रवेशनिश्चितीची शक्यता आहे.

- के. आर. पवार,

गटनिदेशक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निगडी

loading image
go to top