देहूरोड येथे सापडलेल्या 'त्या' मृताचा खून; पोलिसांनी आरोपींना असे शोधले

टीम ई-सकाळ
Monday, 15 June 2020

  • मृताच्या शर्टवरील टेलरमार्कवरून पटविली ओळख 
  • मृताकडील मोबाईलमुळे आरोपी अडकले जाळ्यात 
  • लॉकडाउनमुळे पैसे नसल्याने निघाले होते मुंबईला पायी 

पिंपरी : लॉकडाउनमुळे अडकलेली तीन अल्पवयीन मुले व एक व्यक्ती मुंबईच्या दिशेने पायी निघाले. निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून देहूरोडपर्यंत पायी येत असताना तीन अल्पवयीन मुलांची एका व्यक्तीशी ओळख झाली. तिघांपैकी एका अल्पवयीन मुलाने सोबतच्या अनोळखी पादचाऱ्याकडे पैसे मागितले. मात्र, त्यांनी पैसे दिले नाहीत. त्याचा राग मनात धरुन तीन अल्पवयीन मुलांनी पदचाऱ्याला झोपेतच डोक्‍यात दगड घालून ठार मारले. त्यांचेजवळील पैसे व मोबाईल काढून पसार झाले. या घटनेची कोणतेही धागेदोरे नसताना केवळ मृताच्या शर्टवरील टेलरमार्कवरून पोलिसांनी मृताची ओळख पटविली, तर आरोपींकडे असलेल्या मृताच्या मोबाईलमुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला यश आले. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

दत्तात्रेय कृष्णाजी माचर्ला (वय 41, रा. शांतीनगर सहायोगगर, भिवंडी, मूळ- इंद्रा वसाहत, भवानी पेठ, घोडगेवस्ती, सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 8 जूनला देहूरोड रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे पुलावर एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. याबाबत देहुरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृताची ओळख पटत नव्हती मात्र, युनिट पाचच्या पथकाने मृताच्या अंगावरील कपड्याच्या टेलर टॅगवरुन शोध घेतला असता मृत व्यक्तीचे कपडे हे भिवंडी येथील प्रिंन्स टेलर, भिवंडी येथे शिवले असल्याचे समोर आले. या टेलरला मृताच्या अंगावरील कपडे दाखवून नातेवाईकांचा शोध घेतला असता मृताची ओळख पटली. 

मृत माचर्ला हे मूळचे सोलापूर येथील असून ते सध्या भिवंडी येथे राहत असल्याचे समजले. ते लॉकडाऊन पूर्वी सोलापूर येथील नातेवाईक यांच्याकडे गेले होते व लॉकडाऊनमुळे सोलापूर येथे अडकून पडले होते. परंतु कुटुंबियांच्या काळजीने पैशाअभावी ते सोलापूर येथून भिवंडी येथे पायी चालत निघाले होते. दरम्यान, मृताचे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरुन तांत्रिक विश्‍लेषण केले असता 10 जूनला आरोपी हे सायन मुंबई येथील असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांच्या दोन टीम मुंबई येथे रवाना झाल्या व एक टीम देहू रोड परिसरात तपास करीत होती. तांत्रिक विश्‍लेषनावरुन आरोपींनी मुंबईतील वडाळा परिसरातील काही व्यक्तींशी संपर्क ठेवला असल्याचे तपासामध्ये समोर आले. त्यावरुन वडाळा येथील कमलानगर झोपडपट्टी येथे त्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आरोपींनी त्यांचे मोबाईलवर त्यांच्या वडिलांकडून 300 रुपये गुगल पेद्वारे मिळवल्याचे समजले. दरम्यान, या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचे मोठ्याप्रमाणात रूग्ण असतानाही पोलिसांनी जोखीम पत्करून आरोपींचा शोध घेतला. तेथे केलेल्या तपासात आरोपी हे अल्पवयीन असून त्यांची नावे निष्पन्न झाली. परंतु, ते तेथे मिळून आले नाहीत. मुंबई येथे केलेल्या तांत्रिक तपासावरुन एका अज्ञात फोन नंबरवरुन आरोपी हे वडीलांना हैद्राबाद येथे फोन करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी यांचे हैद्राबाद कनेक्‍शन पुढे आले. त्यामुळे मुंबई येथील तपास पथक तात्काळ हैद्राबाद येथे रवाना झाले. तसेच एका अल्पवयीन मुलाच्या वडीलांना युनिट पाचच्या कार्यालयात तपासासाठी बोलावून घेतले. 

अल्पवयीन मुलाच्या वडीलांकडे त्यांच्या मुलाच्या ठावठिकाणाबाबत चौकशी केली असता उपयुक्त माहिती मिळत नव्हती. त्यामुळे तपास पथकाने वेगळी शक्कल लढवून एका अल्पवयीन मुलाला त्याच्या वडिलांच्या फोनवर संपर्क करण्यास भाग पाडले असता आरोपी यवत येथील खामगाव येथे असल्याचे समोर आले. यावरून त्यांना ताब्यात घेतले. 

ही अल्पवयीन मुले तेलंगना राज्यातील विजयवाडा, हैदराबाद व रंगारेड्डी अशा वेगवेगळया भागातील आहेत. यापुर्वी हैद्राबाद व मुंबईतील चाईल्ड होम येथे राहण्यास होते. त्यांची तेथे चांगली ओळख होऊन मैत्री झाली असल्याचे तपासामध्ये समोर आले. तिघांनाही वेगवेगळे ठेऊन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आरोपी व मृत व्यक्ती हे भक्ती शक्ती चौक येथून एकमेकांशी बोलत पायी चालत मुंबई येथे जात होते. त्यावेळी एकाने माचर्ला यांच्याकडे पैसे मागितले. परंतु, त्याने पैसे दिले नाहीत. त्याचा राग मनात धरुन आरोपींनी माचर्ला हे झोपल्यावर त्याचे डोक्‍यामध्ये दगड घालून त्यास मारुन त्याचेजवळील पैसे लुटण्याचे आपआपसात ठरविले. त्यानुसार देहुरोड येथे रेल्वे पुलाजवळ आल्यानंतर माचर्ला हे रेल्वे पुलाचे कडेला फुटपाथवर झोपलेले असताना त्याचे डोक्‍यामध्ये दगड घालुन त्यास ठार मारून त्येंच्याकडील पैसे व मोबाईल काढून घेत तेथून पळ काढला. 

सात दिवस अडीच हजार किलोमीटरचा प्रवास 

मृत व्यक्ती व आरोपी हे पुणे येथील स्थानिक नव्हते. त्यांचा ऐकमेकांशी काहीही संबंध नव्हता केवळ रस्त्याने पायी जात असताना त्यांचा एकमेकांशी भक्तीशक्ती चौक, निगडी येथे संपर्क झाला. व देहुरोड येथे खुनाची घटना घडली होती. त्यामुळे मृताची ओळख पटवणे व अज्ञात आरोपींचा शोध लागणे जिकरिचे होते. मात्र, गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने गेली सात दिवस पुणे, मुंबई, सोलापुर, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगना असे जवळपास अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करुन मृताच्या अंगावरील कपड्याच्या टेलरमार्कवरून मृताची ओळख पटवली. व त्यानंतर आरोपिंचा शोध घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in dehuroad unkown person murder case solve by crime branch police