भाऊ गृहमंत्री असताना साइड ब्रॅंचमध्ये केलं काम; सहाय्यक पोलिस आयुक्तांचं अजित पवारांकडून कौतुक  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 February 2021

  • उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राजाराम पाटील यांचे कौतुक 

पिंपरी : दिवंगत आर. आर. पाटील हे बारा वर्षे गृहमंत्री असतानाही त्यांचे सख्खे बंधू सहाय्यक पोलिस आयुक्त राजाराम पाटील हे गृहमंत्र्यांचा भाऊ म्हणून कधीच मिरविले नाहीत. सख्खा भाऊ गृहमंत्री असताना बारा वर्षे त्यांनी साइड ब्रॅंचमध्ये काम केले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्या बंधूंच्या साध्या रहाणीमानाचं कौतुक केले. तसेच, एखाद्याचा लांबचा नातेवाईक गृहमंत्री असला तरी तो सगळं पोलिस डिपार्टमेंट चालवत असतो, असेही पवार यांनी नमूद करताच सभागृहात हशा पिकला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात मागील दीड वर्षांपासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त राजाराम पाटील यांची नुकतीच कोल्हापूर येथे करवीर विभागात बदली झाली. त्यानिमित्त शुक्रवारी (ता. 5) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण प्रेक्षागृहात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सेवा उपक्रम, एक्‍स ट्रॅकर उपक्रम, विविध सोशल मीडिया पेजेसचे उद्‌घाटन कार्यक्रमात पाटील यांचा पवारांच्या हस्ते सत्कार झाला. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवार म्हणाले, "आर. आर. पाटील सर्वाधिक बारा वर्ष गृहमंत्री राहिले. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्याही वेळेस राजाराम पाटील पोलिस दलात अधिकारी होते. पण, कधीही ते गृहमंत्र्यांचा भाऊ आहे, असे मिरविले नाहीत. त्यांची पोलिस दलात 33 वर्षे सेवा झाली असून, स्वतःचा सख्खा भाऊ बारा वर्षे गृहमंत्री असतानाही त्यांनी वीस वर्षे साइड ब्रॅंचला काम केले. राजाराम पाटील यांना 651 बक्षिसे, दोन वेळेस राष्ट्रपती पदक मिळाले आहे. त्यांच्यासारखा शांत, सरळ, शिस्तबद्ध असा अधिकारी पाहिला नाही. नाहीतर काही अधिकारी सतत क्रीम पोस्टींगसाठी धडपडत असतात. ज्याचा त्याचा स्वभाव असतो.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deputy chief minister ajit pawar lauds assistant commissioner of police rajaram patil at pimpri chinchwad