esakal | गृहिणींनो, यंदा दिवाळीचा फराळ महागणार; किराणामालाच्या दरात झालीय वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

गृहिणींनो, यंदा दिवाळीचा फराळ महागणार; किराणामालाच्या दरात झालीय वाढ

दिवाळीच्या फराळाकरिता लागणाऱ्या डाळी, साखर, गूळ, डाळ्या यांसारख्या किराणा मालाच्या किमती गतवर्षाच्या तुलनेत भरमसाट वाढल्याने यंदा फराळ महागणार आहे.

गृहिणींनो, यंदा दिवाळीचा फराळ महागणार; किराणामालाच्या दरात झालीय वाढ

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : दिवाळीच्या फराळाकरिता लागणाऱ्या डाळी, साखर, गूळ, डाळ्या यांसारख्या किराणा मालाच्या किमती गतवर्षाच्या तुलनेत भरमसाट वाढल्याने यंदा फराळ महागणार आहे. वर्षभरात अनेक वस्तूंची दुपटीपेक्षा जास्त भाववाढ झालेली आहे. गतवर्षी दोन हजार रुपयांत झालेल्या फराळाच्या यादीकरता यंदा किमान तीन हजार रुपये मोजावे लागतील, अशी स्थिती आहे. किराणा दुकानात सामानाच्या यादीचे बिल पाहता यंदाची दिवाळी नक्कीच सर्वसामान्यांचे दिवाळे काढेल, असे चित्र आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

दीपोत्सवाचा सण म्हणून दिवाळी घराघरांत साजरी होते. हा सण हिवाळ्यात येणारा असल्याने या दिवसात शरीराला स्निग्धतेची गरज अधिक असते. त्यामुळेच दिवाळीत सुकामेवा असलेल्या डाळीच्या पिठाचे लाडू, करंजी, अनारसे, चिवडा, शंकरपाळे यांसारख्या तूप-तेलात तळलेले पौष्टिक फराळ करण्याची परंपरा आहे. आजही घराघरांतून ती कायम आहे. दिवाळी आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपली असून, फराळाचे पदार्थ तयार करण्यास घरोघरी सुरुवात होणार आहे. मात्र, यंदा फराळासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या दरात गतवर्षाच्या तुलनेत सरासरी 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट बसविताना कसरत होत आहे. 

किराणा मालाची 20 ते 25 टक्के भाववाढ 

दिवाळीत भाजणी चकली आणि विविध गोडाचे पदार्थ करण्यासाठी लागणाऱ्या विविध किराणा मालाच्या किमतीत गतवर्षीपेक्षा यंदा 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींसह रवा, मैदा आणि भाजके पोह्याचे दर मागील वर्षाच्या तुलनेत वाढले आहे. मात्र गेल्या आठवड्यापेक्षा त्यात फारसा चढ-उतार दिसत नसल्याचे किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्‍यामअर्जुन मेंगराजानी यांनी सांगितले. 

हरभरा डाळ महागणार 

हरभरा डाळीच्या बेसनापासून लाडू तयार केला जातो. या लाडूची मागणीही जास्त असते. परंतु, आता बाजारात हरभरा डाळ व बेसनाच्या मागणीत वाढ होत आहे. पण त्या तुलनेत पीक कमी असल्याने पुढील आठवडाभरात हरभरा डाळीचे भाव वाढण्याची शक्‍यता आहे. 

यंदा दिवाळीनिमित्त फराळ खरेदी करतेवेळी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सर्वच डाळींच्या किमती वाढल्याने चकली, लाडू कमी प्रमाणात करणार आहे. 

- सुनीता पाटील, बिजलीनगर 

तेलाची दरवाढ पाहून शॉक बसला आहे. यंदा मोजकेच पदार्थ बनविणार आहे. 

- सीमा इनामदार, पिंपरी 

साहित्य / दर (प्रतिकिलो मागे) 

  • शेंगदाणे 90-100 
  • तूरडाळ - 100 
  • मूगडाळ - 100 
  • हरभरा डाळ -66-74 
  • मैदा -28-30 
  • खोबरे -160 
  • रवा -28-30 
  • साखर -34-36 
  • भाजके पोहे -60