
कोरोनाचा संसर्ग गेल्या पंधरा दिवसांपासून वाढला आहे. लॉकडाउनच्या अफवा सोशल मीडियावर पसरू लागल्याने चोहीकडे दररोजच्या जगण्याची चिंता सतावू लागली आहे. पहिल्या लॉकडाउनमध्ये रोजंदारीवरील लोकांच्या जगण्याची फरपट झाली.
जीवन जगणे मुश्कील होईल अशा विवंचनेने सामान्य माणूस हवालदिल
पिंपरी - कोरोनाचा संसर्ग गेल्या पंधरा दिवसांपासून वाढला आहे. लॉकडाउनच्या अफवा सोशल मीडियावर पसरू लागल्याने चोहीकडे दररोजच्या जगण्याची चिंता सतावू लागली आहे. पहिल्या लॉकडाउनमध्ये रोजंदारीवरील लोकांच्या जगण्याची फरपट झाली. या स्थितीची पुनरावृत्ती होऊन जगणेच मुश्कील होईल की काय अशा विवंचनेत सर्वजण सापडले आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, मजूर, कंपनी कामगार, भाडेकरू, घरेलू महिला कामगार, किरकोळ विक्रेते चिंतातूर झाले आहेत. परिणामी, या सर्वांच्या तोंडून एकच सूर ऐकावयास मिळत आहे, ‘लॉकडाऊन नको रे बाबा..।’
सध्या शहरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दररोज अडीचशेच्यावर रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. कोरोना संसर्ग जागेवरच रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू केली आहे. कोरोना आटोक्यात न आल्यास कठोर पावले उचलण्याची वेळ येऊ देऊ नका? असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी सांगितल्याने सर्वजण हवालदिल झाले आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अफवांचा परिणाम
लॉकडाउनच्या भीतीपोटी कंपन्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. वाहतुकीची सोय, पगार कपात, सुट्ट्या असे प्रश्न येणे सुरू झाले आहेत. त्याचप्रकारे काहीजण एकमेकांना लॉकडाउनच्या वस्तुस्थितीबाबत विचारणा करत आहेत. काहीजणांनी आत्तापासूनच घरात पुन्हा किराणा आणि धान्यसाठा करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच जणांनी पुन्हा सहल बुकिंग बद्दल चौकशी करीत आहेत. तसेच आयटी कंपन्या देखील मनुष्यबळ कपातीचा विचार करीत आहेत. असे पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मी युपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. या शहरात ग्रंथालये, अभ्यासिका चांगल्या असून केवळ अभ्यास चांगला होतो, म्हणून मी थांबलो आहे. मात्र, पहिल्याप्रमाणे लॉकडाउन जाहीर झाल्यास खानावळी बंद होतील. उपाशी राहण्याची वेळ येईल. गावी परत ये असे फोन सुरू झाले आहेत.
- ओंकार लोखंडे, आकुर्डी
संचारबंदीचे नियम सध्या शिथिल आहेत. मात्र, आमचे पूर्वी कामावर जाण्या-येण्याचे खूप हाल झाले. कामावर येताना पोलिस रस्त्यात अडवत. वाहने बंद होती. बस नव्हती. त्यामुळे आता कंपनीत आम्ही आधीच विचारणा करत आहोत की, असे झाल्यास काय करायचे? कंपनी जबाबदारी घेईल का?
- रघुनाथ होडेकर, कामगार, चिखली
मी मूळचा झारखंडचा आहे. लॉकडाउन झाल्या आम्हाला पगार मिळणार का? गावाकडे जाता येईल का? तीन महिने आम्ही खूप हलाखीत दिवस काढले आहेत. कठोर निर्णय घेवू नये. सरकारने सर्व गटातील लोकांचा विचार करावा.
- जे. पी. सिंग, कामगार, तळवडे
गेल्या महिन्यांत कामावरून अनेक कर्मचारी काढले. सध्या कामाचे स्वरूप बदलले आहे. पेट्रोल-डिझेल महागले आहे. एका किलोमीटरमागे पाच रुपये मिळतात. कंपनीकडून कालच संदेश आले आहेत की, एक मार्चला पेट्रोलचे दर वाढल्याने कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे पोटात गोळा आला आहे. आधीची परिस्थितीच सावरलेली नाही.
- फूड डिलिव्हरी बॉय, पिंपरी-चिंचवड
Edited By - Prashant Patil