
पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयांना निर्देश न मिळाल्याने महाविद्यालये ओस
पिंपरी - इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग सुमारे दीड वर्षांनी सुरू झाले. त्यापाठोपाठ सर्व वरिष्ठ महाविद्यालये आजपासून (ता. १२) सुरू करण्यास राज्य शासनाकडून परवानगी मिळाली होती. परंतु, अद्याप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयांना निर्देश न मिळाल्याने वर्ग भरले नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनामुळे शहरातील शाळा, महाविद्यालये मार्च महिन्यापासून बंद करण्यात आली होती. ती महाविद्यालये ता. १२ ऑक्टोबरपासून सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ ऑक्टोबरला जाहीर केले होते. तशी घोषणा केली होती. राज्य शासन व स्थानिक प्रशासनाच्या सुचनांच्या अनुषंगाने महाविद्यालय सुरू होत असल्याने विद्यार्थी व शिक्षक आनंदात होती. विद्यार्थी समोर असल्यावर शिकविण्यात मिळणारा आनंद ऑनलाइन शिकविण्यात येत नाही असे मत शिक्षकांनी व्यक्त केले होते.
त्याअनुशंगाने शहरातील पुणे विद्यापीठांतर्गत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे, इतर मॅनेजमेंट शाखेचे जवळपास ७० महाविद्यालयांनी सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारी केली होती. परंतु शासन व विद्यापीठाचा निर्णय न झाल्यामुळे महाविद्यालये सुरू होणार की नाही याबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज प्रत्यक्ष वर्ग भरले नाहीत. काही ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थी प्रवेशासाठी उपस्थित होते. बहुतांश महाविद्यालयांमधील वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवले. शहरातील महाविद्यालयांना या संदर्भात कुठलीच अधिकृत माहिती प्राप्त न झाल्यामुळे महाविद्यालये सुरू झाली नसल्याचे अनेक महाविद्यालयाच्यावतीने सांगण्यात आले. लवकरच सुरू होईल, अशी आशा काही महाविद्यालयांनी व्यक्त केली.
दरम्यान, भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे वाणिज्य, कला आणि विज्ञान महाविद्यालया मंगळवारी फुलांच्या पाकळ्या आणि रांगोळीच्या पायघड्या टाकून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.