बापरे! पिंपरीत कोरोनाच्या काळात १३० बाळांचा जन्म, अन् सगळेच्या सगळे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

गेल्या 80 दिवसांत 498 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यात कोरोनासदृश्‍य लक्षणे असलेल्या 130 गरोदर महिलांचा समावेश होता.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी आढळला. तेव्हापासून शुक्रवारी (ता.  29) सायंकाळी सातपर्यंत अर्थात गेल्या 80 दिवसांत 498 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यात कोरोनासदृश्‍य लक्षणे असलेल्या 130 गरोदर महिलांचा समावेश होता. तर नऊ महिलांना संसर्ग झालेला होता. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले. या कालावधीत 130 बाळांचा जन्म झाला. त्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली असून, रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात मार्च महिन्याच्या 11 तारखेला पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून रुग्णालयात दाखल झालेल्या नऊ पैकी चार महिलांच्या प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया (सिझरीयन) करावी लागली. दोन महिलांची प्रसुती झाल्यानंतर त्यांना संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळले. अन्य तीन महिलांपैकी दोन जणी तीन महिन्यांच्या व एक महिला पाच महिन्यांची गर्भवती होती. त्यांच्यावर चौदा दिवस उपचार करून घरी सोडण्यात आले. सध्या एका महिलेवर उपचार सुरू आहेत. तसेच, कोरोना संशयित म्हणून नमुने तपासलेल्या 130 महिलांची प्रसुती झाली आहे. त्यांच्या बाळांसह मातांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले आहेत. 

पिंपरीत आणखी 38 नवे रुग्ण; आता अजंठानगर, नेहरूनगरमध्ये कोरोनाचा शिरकाव
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वायसीएममध्ये कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र प्रसुतिकक्ष व स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष उभारला आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी व उपचारासाठी 24 तास स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती केलेली आहे. सुरक्षितता म्हणून रुग्णांनाही पीपीई किट दिले जात आहेत. प्रसुतिच्या वेळी बालरोग तज्ज्ञ उपस्थित असतात. अतिदक्षता विभागाची (आयसीयू) सोय केलेली आहे. वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाकाली डॉ. महेश आसलकर, डॉ. हेमराज नारखेडे, डॉ. आनंद करळे, डॉ. स्मिता ठक्करवाड, डॉ. कुणाल शिंदे, डॉ. रेणू या स्त्रीरोग तज्ज्ञांनी उपचार केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During the Corona period, 130 babies were born in Pimpri Chinchwad