मावळातील 'या' गावाचा वर्षानुवर्षाचा अंधकार अखेर मिटला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 July 2020

- मनसेने दूर केला वर्षानुवर्षाचा अंधकार            

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुका मनसेने स्वखर्चातून वडगाव शहराजवळील दुर्लक्षित असलेल्या डोंगरवाडीच्या पाऊलवाटेवर असंख्य पथदिवे लावून वर्षानुवर्षे येथे असलेला अंधार व ग्रामस्थांची गैरसोय दूर केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वडगाव मावळात जाणार असाल, तर थांबा! आधी ही बातमी वाचा...

वडगाव शहराला लागूनच नागमोडी व अवघड पाऊल वाट असणारा तसेच, उर्से ग्रामपंचायत हद्दीत येणारा डोंगर म्हणजेच डोंगरवाडी गाव. जेमतेम १५-२० घरांचा व १०० ते १२५ लोकसंख्या असणारा हा डोंगरमाथ्यावरील भाग. दुर्गम असल्यामुळे अनेक वर्षापासून सोयी सुविधांपासून वंचित राहिला होता. गेल्या काही वर्षांपूर्वी गावाला वीज व पाण्यासारख्या मूलभूत सुविधा मिळाल्या आहेत. गावकऱ्यांच्या रोजच्या वापरासाठी व दैनंदिन दळणवळणासाठी उपयुक्त व सोयीस्कर असणारा रस्ता म्हणजे वरदायनी मंदिर (वडगाव) ते डोंगरवाडी. या पाऊलवाटेवर अनेक वर्षांपासून पथदिवे व विजेची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी खूप मोठा काळोख पसरत होता. त्यामुळे डोंगरावर राहणाऱ्या ग्रामस्थांना (शालेय विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यवसायिक, शेतकरी) तसेच, डोंगराच्या निसर्ग सानिध्यात ट्रेकिंग व भटकंती करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अंधारातून वाट शोधायला मोठी कसरत करावी लागत होती. त्याचप्रमाणे वाटेवर अनेक विषारी वन्यजीव व नरभक्षक प्राण्यांचा वावर असल्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.

मावळात आज कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली, एकूण आकडा पाहा

नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या या समस्येची दखल घेऊन मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी डोंगरवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार स्वखर्चातून व कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून वरदायनी मंदिर ते डोंगरवाडी गाव या रस्त्यावर नुकतेच विद्युत पथदिवे (स्ट्रीट लाईट) बसविले आहेत. गेल्या २० ते २५ वर्षांपासून हा रस्ता व डोंगर अंधाराच्या छायेखाली दडला गेला होता. मात्र, मनसेच्या या समाजोपयोगी कामातून संपूर्ण डोंगर विद्युत पथदिव्यांनी लख्ख प्रकाशात उजळून निघाल्यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला व आभारही मानले. या उपक्रमास नवनाथ शिवेकर, विकास साबळे, आकाश वारींगे, सोमनाथ नवघणे, संतोष म्हाळसकर, सुरेश धनावडे, मिलिंद भवार, लहूदास म्हाळसकर, युवराज भोसले, गणेश म्हाळसकर, ओंकार भांगरे, विक्रम कदम आदींनी हातभार लावला. महावितरण व डोंगरवाडी येथील कानिफनाथ तरुण मंडळाचेही सहकार्य लाभले.

Edited by : Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity in dongarwadi maval to initiative of MNS