भोसरीत अतिक्रमण कारवाई; नियम मोडणाऱ्या एवढ्या विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त

भोसरीत अतिक्रमण कारवाई; नियम मोडणाऱ्या एवढ्या विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त

भोसरी : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दहा दिवसाच्या लॅाकडाउननंतर औषधांची दुकाने वगळून भाजी मंडईसह इतर दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिले आहेत. भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरात दुकाने सायंकाळी पाचच्या सुमारास बंद होतात. मात्र, रस्त्यावर बसणारे भाजी-फळे विक्रेते पाचनंतरही विक्री सुरू ठेवत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

१४ ते २३ जुलैचा लॅाकडाउन भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरातील नागरिकांनी यशस्वी केला. लॅाकडाउननंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने भाजमंडईसह दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दुकानदारांना दिले आहेत. या नियमांमधून औषधांच्या दुकानांना वगळण्यात आले आहे. भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरातील दुकाने सायंकाळी पाचच्या सुमारास बंद होताना दिसतात. मात्र, भोसरीतील पीएमटी चौक, दिघी रस्ता, संत तुकारामनगर, आदिनाथनगरजवळील सावित्रीबाई फुले शाळेसमोरील रस्ता, इंद्रायणीनगरातील मिनी मार्केट, श्री स्वामी समर्थ शाळेसमोरील रस्ता, दिघीतील राजे छत्रपती श्री संभाजी महाराज चौक, विठ्ठल मंदिरापर्यंतचा रस्ता आदी भागातील रस्त्यावर भाजी-फळे विक्रेते सायंकाळी पाचनंतरही रस्त्यावर भाजी-फळे विक्री करताना दिसून येतात. भोसरीतील पीएमटी चौकात दुकाने बंद झाल्यावर बंद दुकानाच्या ओट्यांवर भाजीची दुकाने थाटली जातात. सायंकाळी पाचनंतर पोलिस अथवा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आल्यावरच भाजी विक्रीते थाटलेली दुकाने बंद करतानाचे चित्र येथे नेहमीच पहायला मिळते.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व ग्राहकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभाग, त्याचप्रमाणे पोलिसांना दिले आहेत. महापालिकेद्वारे शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक अतिक्रमणविरोधी पथक तैनात केले आहे. या पथकामध्ये अतिक्रमण बीट निरीक्षक, पाच पोलिस, पाच होमगार्ड आदींसह १४ कर्मचाऱ्यांचा समावश आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


              
पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेने काही नियमांचे बंधन दुकानदार, भाजी-फळे विक्रेत्यांना घालून दिले आहे. परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांना दंडही आकारण्यात येणार आहे. शहर परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात दररोजच कारवाई करण्यात येत आहे.
- राजेंद्र राणे, कार्यकारी अभियंता, बांधकाम परवानगी विभाग

आजच्या कारवाईत १९ हातगाड्या जप्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे सोमवारी (ता. २७) पिंपरी आणि भोसरीत बांधकाम परवाना विभागाचे कार्यकारी अभियंते राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. भोसरीत अतिक्रमण अधीक्षक परशुराम वाघमोडे, तर पिंपरीत अतिक्रमण निरीक्षक मुगुटराव सावंत यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.  भोसरीतील दिघी रस्ता, आळंदी रस्ता, पीएमटी चौक, भोसरी गावठाण, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता आदी भागात कारवाई करत १३, तर पिंपरीतील शगुन चौकात कारवाई करत ६ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तर पिंपरी, भोसरीतील कारवाईत एकूण २१ वजनकाटे तर १३ कॅरेटही ताब्यात घेण्यात आले.  
 
दुकानदारांद्वारे भाववाढ

लॅाकडाउनमुळे दुकाने सायंकाळी पाच वाजता बंद करण्यात येतात. त्यामुळे किराणा माल खरेदी करण्यासाठी नागरिकांची दुकानावर गर्दी होते. याचा फायदा घेत काही दुकानदारांद्वारे किराणा माल प्रत्येक किलोमागे एक ते पाच रुपये भाववाढ करून विक्री करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे भाजी विक्रेतेही  भाज्या भाववाढ करून विकताना दिसत आहेत.  मुळातच लॅाकडाउनमुळे नागरिकांना काम मिळत नाही. त्यामुळे कामगार आर्थिक अडचणीत अडकला आहे. त्यातच काही दुकानदारांनी  या  परिस्थितीचा फायदा घेत केलेल्या भाववाढीमुळे कामगार, नागरिक मेटाकुटीस आला आहे. भाववाढ करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com