Vallabhnagar Bus Stand : प्रवेशद्वार, स्वच्छता, सुरक्षाही टांगणीला; वल्लभनगर आगारातील कामांसाठी महामेट्रो आणि एसटीत ‘तू तू-मै मै’

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या जागेवर महामेट्रो प्रशासनाने दुचाकी आणि चारचाकी वाहनतळ सुरू केले.
Vallabhnagar Bus Stand
Vallabhnagar Bus Standsakal
Updated on

पिंपरी - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या जागेवर महामेट्रो प्रशासनाने दुचाकी आणि चारचाकी वाहनतळ सुरू केले. पण, तेथे अस्वच्छता आहे. शिवाय, सीसीटीव्ही नसल्याने सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

त्यामुळे हा परिसर स्वच्छ करून येथे सीसीटीव्ही लावण्याची आणि मुख्य प्रवेशद्वाराचे काम करून देण्याची मागणी आगार व्यवस्थापनाने महामेट्रो प्रशासनाकडे केली. मात्र, त्यासाठी नकार देण्यात आला. त्यामुळे विकासकामावरून एसटी आणि मेट्रो प्रशासनात ‘तू तू-मै मै’ सुरू असल्याचे दिसून येते.

वल्लभनगर येथे सुमारे ३.२० हेक्टर परिसरात एस.टी. महामंडळ आगाराचा विस्तार झाला आहे. शहरातील हे महत्त्वाचे स्थानक असून, येथे दररोज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथून ३२७, तर मुंबई मार्गावरील १८३ बसेस ये-जा करतात. स्थानिक आगाराच्याही तीस बसेस येथून सुटतात. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची येथे वर्दळ असते.

दरम्यान, महामेट्रो प्रशासनाने पिंपरी ते जिल्हा न्यायालय मार्गावर संत तुकारामनगर मेट्रो स्थानक उभारण्यासाठी एस.टी. महामंडळाची चार हजार चौरस मीटर जागा घेतली. या बदल्यात पिंपरी-चिंचवड आगाराचे नूतनीकरण आणि काँक्रिटीकरण करून देण्याचा करार केला होता.

सोबतच एसटी प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वारासह इतर किरकोळ कामे करुन देण्याची मागणी केली आहे. पण, मेट्रो प्रशासनाने करारात ठरल्यानुसार सर्व कामे करुन दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वल्लभनगर आगारातील रखडलेली विकासकामे नक्की कोण करणार, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

नाकाला रुमाल लावण्याची वेळ

मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रशासनाने एसटीच्या जागेवर पार्किंग सुविधा सुरू केली आहे. पण, येथे वाहने आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले नाहीत. तसेच येथे स्वच्छता कर्मचारी नेमले नसल्याने अस्वच्छता पसरली आहे.

त्यामुळे येथून एसटी स्थानकात जाणाऱ्यांना नाकाला रुमाल लावण्याची वेळ आली आहे. याबाबत एसटी प्रशासनाने मेट्रोकडे पत्रव्यवहार केला असून, ही कामे तत्काळ करण्याची मागणी केली आहे. त्याला मेट्रो प्रशासनाने सहमती दर्शवली आहे.

ही कामे अर्धवट

रंगरंगोटी, आगारातील पेट्रोलपंप आणि वर्कशॉप जागेचे काँक्रिटीकरण, मुख्य प्रवेशद्वार

मेट्रो प्रशासनाने करारानुसार सर्व कामे करून दिली आहेत. मेट्रो पार्किंगमधील सीसीटीव्ही आणि स्वच्छतेसाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल.

- हेमंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

मेट्रो प्रशासन मुख्य प्रवेशद्वारे बसवून देणार होते. पण, अद्याप बसवून दिलेली नाहीत. सर्व कामे अर्धवट सोडून दिली आहेत. त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यांच्या पार्किंगच्या जागेत सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली आहे.

- बालाजी सूर्यवंशी, आगार व्यवस्थापक, वल्लभनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com