भोसरी : विद्युत रोहित्राच्या स्फोटातील आजी, नाती पाठोपाठ मुलीचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

रोहित्राच्या स्फोटात जखमी झालेल्या आजी, त्यांची मुलगी आणि नात या तिघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भोसरी : येथील इंद्रायणनगरातील राजवाड्यातील बिल्डिंग क्रमांक-तीन जवळील विद्युत रोहित्राचा शनिवारी (ता. 5) दुपारी दीडच्या सुमारास स्फोट झाला. त्या आगीत गंभीर जखमी झालेल्या हर्षदा सचिन काकडे यांचा मंगळवारी (ता. 8)  सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला.  

सुशांतसिंग राजपूतच्या 'पवना' येथील फार्महाऊसची एनसीबीकडून झाडाझडती

रोहित्राच्या स्फोटात जखमी झालेल्या आजी, त्यांची मुलगी आणि नात या तिघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या स्फोटांमध्ये शारदा दिलीप कोतवाल (वय 51) व त्यांची पाच महिन्याची नात शिवण्या सचिन काकडे यांचा शनिवारी (ता. 5) ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी हर्षदा सचिन काकडे (वय 32) यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज मंगळवारी अशयस्वी ठरली. 

पिंपरी-चिंचवड शहरात विजेच्या कडकडाटासह धो-धो पाऊस

कोतवाल कुटुंबीयांच्या घरापासून अवघ्या दहा फूट अंतरावर विद्युत रोहित्र आहे. शनिवारी शारदा कोतवाल या त्यांची नात शिवण्याला बाहेर ओट्यावर अंघोळ घालत होत्या, तर त्यांची मुलगी हर्षदा शेजारी बसल्या होत्या. नेमका त्याचवेळी विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. त्यातील तेल स्फोटात आगीच्या ज्वाळांसह जोरदार बाहेर फेकले गेले. ते तेल शारदा, हर्षदा व शिवण्याच्या अंगावर पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. एकाच घरातील आजी, मुलगी आणि नातीचा, असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grandmother, granddaughter and daughter also death in transformer blast in bhosari