आळंदी-पुणे पालखी मार्गावर अनुभवता येणार संत भेट; समूहशिल्पाचे अर्धवट काम होणार पूर्ण  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

आळंदी-पुणे पालखी महामार्गावर वडमुखवाडी येथे पिंपरी-चिंचवड महापालिका संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प साकारत आहे.

पिंपरी : आळंदी-पुणे पालखी महामार्गावर वडमुखवाडी येथे पिंपरी-चिंचवड महापालिका संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प साकारत आहे. गेल्या चार वर्षांपासून हे काम सुरू आहे. ते मार्गी लागण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांची तरतूद स्थायी समिती सभेने केली आहे. त्यामुळे समूहशिल्पाचे काम अर्धवट काम पूर्ण होण्यास मदत होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वारकरी सांप्रदायाचे तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहू हे पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीला लागून आहेत. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त अनुक्रमे संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे शहरातून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदी-पुणे मार्गाने, तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने जात असतो. या मार्गावर निगडी येथे संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारित भक्ती-शक्ती शिल्पसमूह महापालिकेने उभारले आहे. याच पद्धतीने आळंदी-पुणे पालखी मार्गावर वडमुखवाडी येथील पादुका मंदिर परिसरालगत संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित शिल्पसमूह उभारण्याचे काम चार वर्षांपासून सुरू केले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आळंदी व देहू येथे दर्शनासाठी आणि पालखी सोहळ्यासाठी लाखो भाविक राज्य-परराज्यातून दरवर्षी येत असतात. आषाढीवारीला जात असताना संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा सकाळच्या विश्रांतीसाठी वडमुखवाडी येथील पादुका मंदिरात थांबतो. या मंदिरालगतच्या विस्तीर्ण दोन एकर जागेवर महापालिका संत भेटीचे समूह शिल्प साकारत आहे. या समूहशिल्पात 26 मूर्तींचा समावेश असेल. त्यातील 18 मूर्ती विराजमान केल्या आहेत. या शिल्पातील प्रत्येक मूर्तीचे वजन व उंचीची पडताळणी राज्य सरकारच्या कला संचालनालय करीत आहे. 

पिंपरी-चिंचवड : ताथवडेतील रस्त्याचा डाव भाजपच्याच अंगलट

सुरुवातीला समूह शिल्पासाठी महापालिकेने सव्वाकोटी रुपयांची तरतूद केली होती. दरम्यानच्या काळात कला संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून काही बदल सुचविले. दूर अंतरावरून मूर्ती दिसाव्यात, यासाठी सहा मूर्तींची उंची 22 फुटांपर्यंत वाढविण्याचे सुचविले. त्यामुळे शिल्पाचा खर्च वाढला आहे. आतापर्यंत चौथऱ्यासाठी एक कोटी 25 लाख आणि मूर्तींसाठी सहा कोटी 70 लाख, अशी नऊ कोटींची तरतूद केली आहे. त्यातून बऱ्यापैकी कामे झाली आहेत. उर्वरित कामांसाठी निधीची आवश्‍यकता होती. मात्र, कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला. आता स्थायी समिती सभेने सुमारे दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शिल्पाचे उर्वरित कामे करण्यास चालना मिळणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकूण दोन एकर जागेपैकी साठ गुंठे जागा समूहशिल्पासाठी उपलब्ध आहे. त्यावर शिल्प साकारले जात आहेत. मूर्तींबरोबरच ऍम्फी थिएटर व गार्डनही साकारण्यात येत आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना वारीसोबत चालताना भक्तीभावाचे वातावरण तयार व्हावे, हा समूहशिल्पाचा उद्देश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: group sculpture of saint visit On the Alandi-Pune palanquin route