
पिंपरी : काही नागरिक, व्यावसायिक आणि महापालिका यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे शहरातील नाल्यांचा श्वास दिवसेंदिवस कोंडत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका संभवतो.
थेरगाव येथील विसर्जन घाटासमोरील नाल्यात महापालिकेच्या वतीनेच स्वच्छतागृह बांधण्यात येत आहे. त्यासाठी लोखंडी पिलर उभारण्यात येत आहेत. पिलरसाठी खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. स्वच्छतागृह बांधल्यास नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे महापालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग अनधिकृत बांधकामांवर कारवाई करते, तर दुसरीकडे स्वत:च अतिक्रमण करीत आहे. या नाल्यामध्ये काही जणांनी नाल्यामध्येच भराव टाकला आहे. मात्र, पावसाळा सुरू झाला तरी अद्याप हा भराव काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबू शकते. आकुर्डी येथील महापालिकेच्या दवाखान्याजवळ महापालिकेनेच स्वच्छतागृह बांधले आहे. तसेच भाजीमंडईही नाल्यावरच बांधण्यात आली आहे. भोसरी आणि निगडी येथेही नाल्यावरच स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. आकुर्डी येथील नाला तुंबला की पावसाळ्यात नाल्यालगतच्या रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरते, असे तेथील रहिवाशांनी सांगितले.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नियमबाह्य बांधकामे
काही बांधकाम व्यावसायिकांनी सर्रास नाल्यामध्ये अतिक्रमणे करून बांधकामे केली आहेत. ही बांधकामे सुरू असताना महापालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग नेमका काय करीत होता, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. नागरिक, व्यावसायिक, महापालिका या सर्वांकडूनच पर्यावरणाचा जणू गळा घोटण्याचा प्रकार बिनदिक्कत सुरु आहे. निगडीमध्ये अशाच पद्धतीने अतिक्रमण करण्यात आले आहे. बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार नाल्यापासून एक ते दीड मीटरच्या अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. मात्र, या नियमाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. काही जणांच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याने प्रशासनही कारवाई करण्याकडे डोळेझाक करीत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडली, की प्रशासनाचे डोळे उघडणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------
काय आहेत उपाय
विकासकामांसाठी जसा विकास हस्तांतरण हक्क किंवा जमिनीचा आर्थिक मोबदला देऊन महापालिका खासगी जागा ताब्यात घेते. तशाच पद्धतीने सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी जेथे गरज असेल, तेथील जागा महापालिका ताब्यात घेऊ शकते. पाण्याचा वापर करावा लागू नये, यासाठी आधुनिक पद्धतीची पाण्याची गरज नसणारी स्वच्छतागृहे बांधावीत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नाल्यामध्ये केवळ कॉलम उभारण्यात येत आहेत. त्यावर स्लॅब टाकून सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहे. तेथे या कामासाठी कोणीही जागा देण्यास तयार नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही. नाल्याच्या पात्रात मातीचा टाकलेला भराव काम झाल्यावर काढण्यात येणार आहे.
- प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता, ब प्रभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.