esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस; नागरिक, वाहनचालकांची तारांबळ
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस; नागरिक, वाहनचालकांची तारांबळ
  • पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला.

पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस; नागरिक, वाहनचालकांची तारांबळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात शुक्रवारी (ता. 20) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे नागरिक व वाहनचालकाची धांदल उडाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरात सकाळपासून कडाक्‍याचे ऊन होते. मात्र, सायंकाळी साडेचारच्या सुमारास ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे साडेपाचलाच अंधार पडला. पावणेसहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. जोरदार पाऊस त्यात पथदिवेही बंद पडल्याने वाहनचालकांना समोरील रस्ताही दिसत नव्हता. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला वाहन उभे केले. यासह दुचाकीचालकांनी उड्डाणपुलासह लगतच्या इमारतींचा आसरा घेतला. सुमारे दीड तास जोरदार पाऊस सुरू होता. काही वेळाने पावसाचा जोर ओसरला. दरम्यान, कामावरून सुटल्यानंतर घरी निघालेल्या चाकरमान्यांची धांदल उडाली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दापोडी ते निगडी या ग्रेडसेपरेटरमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होते. यासह काळभोरनगर, वल्लभनगर येथील भुयारी मार्ग, चिंचवड स्टेशन येथील सेंट मदर तेरेसा पुलाखालील सेवा रस्ता याठिकाणीही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. 

भोसरीत वीजपुरवठा खंडित 
भोसरी : पुणे-नाशिक महामार्गावरील ऐतिहासिक प्रवेशद्वार, पीसीएमसी चौक, पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील रस्ता, दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्कजवळील सीएमई सीमाभिंत, चक्रपाणी वसाहत रस्ता, दिघीतील सह्याद्री कॉलनी, छत्रपती संभाजी राजे चौक ते विठ्ठल मंदिराकडे जाणारा रस्ता, इंद्रायणीनगरातील संतनगर चौक, महापालिकेची वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिरासमोरील रस्ता आदी भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. याशिवाय दिघी रस्त्यावरील आदर्शनगर परिसर, इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एक व दोनमधील वीजपुरवठाही खंडित झाला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेनकोट, छत्री नसल्याने गैरसोय 
अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दुपारी कडाक्‍याचे ऊन अन्‌ रात्री गारवा, असे वातावरण आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना कोणीही रेनकोट अथवा छत्री सोबत घेत नाहीत. मात्र, शुक्रवारी अचानक पावसाला सुरुवात झाल्याने अनेकजण अडकून पडले. तर काहींनी भिजतच घरी पोहोचले.