
परिचारिकाच ठरताहेत रुग्णसेवेचा कणा
पिंपरी - ‘दादा तुम्ही लगेच जाऊ नका. थोडं थांबा. डॉक्टरांना भेटून जा. रात्री आईंचा ऑक्सिजन (Oxygen) ८० पर्यंत आला होता,’’ हे शब्द आहेत सरकारी रुग्णालयातील (Government Hospital) नर्सचे. (Nurse) रात्री आईला रुग्णालयात (Hospital) ॲडमिट करून घरी गेलेला मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास पुन्हा रुग्णालयात आला, त्यावेळी त्याच्याशी परिचारिका आपुलकीने बोलत होत्या. त्याच्या आईच्या प्रकृतीविषयी सांगत होत्या. कारण, रात्रभर रुग्णांच्या सेवेत त्याच होत्या. आताही प्रत्येक रुग्णालयात हीच स्थिती आहे. परिचारिकाच रुग्णसेवेचा (Patient Service) कणा ठरत आहेत. (Hospital Nurse Day Patients Service)
डॉक्टरांच्या सूचनेनुसार नेमून दिलेल्या वॉर्डात जाऊन प्रत्येक रुग्णाचा रक्तदाब तपासणे, तापमान तपासणे, ऑक्सिजनचे प्रमाण पाहणे, गोळ्या केव्हा घ्यायच्या, जेवणाअगोदर कोणती व जेवणानंतर कोणती गोळी घ्यायची यासह सलाईन लावणे, इंजेक्शन देणे अशी कामे परिचारिकांना करावी लागतात. दिवसांतून किमान दोन वेळा त्यांचा हा तपासणीचा राउंड असतो. शिवाय वॉर्डात डॉक्टर आल्यानंतर त्यांना रुग्णांविषयी माहितीही द्यावी लागते. त्यामुळे त्यांची जबाबदारीही वाढलेली आहे.
हेही वाचा: लोणावळ्यात १५ दिवसात ५० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करणार
गंभीर रुग्णांची अधिक काळजी
खासगी रुग्णालयात पंधरा वर्षांपासून परिचारिका असलेल्या सुजाता देशपांडे म्हणाल्या, ‘‘गेल्या चौदा महिन्यांपासून कोविड वॉर्डात काम करते आहे. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांची अधिक काळजी घ्यावी लागत आहे. वेळप्रसंगी त्यांच्या मनातील भीती घालवावी लागते. नातेवाइकांचा फोन आल्यास त्यांना रुग्णाच्या प्रकृतीविषयी कळवावे लागते. अशाप्रकारे गंभीर रुग्णांवर अधिक लक्ष ठेवावे लागत आहे.’’
आज ३८ वर्षे सेवा झाली. पण, सध्या कोविडकाळात परिचारिकांच्या कामाचे वाटप करताना खूप काळजी घ्यावी लागत आहे. नवीन मुलींना अनुभव फारसा नसतो. कोणी गरोदर असते. काहींचे वय पन्नाशीच्या पुढे आहे. अशांची कोविड वॉर्डात ड्यूटी लावता येत नाही. त्यांचा अनुभव विचारात घ्यावा लागतो. कारण, रुग्णाची जबाबदारी वॉर्डातील नर्सची असते. रुग्ण लवकर बरा होऊन घरी कसा जाईल, याचाच सतत विचार मनात असतो. नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क वापरणे, हात धुणे व सोशल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे आहे.
- मोनिका चव्हाण, मेट्रन, वायसीएम
दृष्टिक्षेपात परिचारिका महापालिका सेवेत
कायम - २३३
एएनएम - ६३
सिस्टर इनचार्ज - २०
पीएचएन - ५
मिडवाईफ - ५
मानधनावर - २७३
खासगी सेवेत - ४००
Web Title: Hospital Nurse Day Patients
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..