#CoronaVirus : पिंपरी-चिंचवडमध्ये कशी झाली कोरोनाची 'एंट्री'...वाचा सविस्तर...

#CoronaVirus : पिंपरी-चिंचवडमध्ये कशी झाली कोरोनाची 'एंट्री'...वाचा सविस्तर...

पिंपरी : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो विमानाने तिघांसोबत दुबईहून आला. त्यानंतर एका विवाहाच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने थायलंडला गेलेल्या वऱ्हाडात शिरला. पाठोपाठ जपान आणि युरोपातून आलेल्या प्रवाशांत बेमालूमपणे मिसळला. दिल्लीच्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी भाविकांचा सहकारी बनला. हळूहळू त्याने आपल्या शहरात पाय रोवायला सुरुवात केली. 

सुरुवातीला उच्चभ्रू सोसायटीत आढळलेला तो सेवा क्षेत्रातील व्यक्तींनाही बाधला. ज्यांना पाहून गुन्हेगारांचा थरकाप होतो, अशा कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्यांच्या आणि ज्यांना पाहून मृत्यूही दूर पळतो, अशा वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या हातावरीही त्याने 'तुरी' दिल्या असाव्या. कालांतराने तो मध्यमवर्गीयांमध्ये बेमालूमपणे मिसळला. अगदी दीड महिन्याच्या चिमुकल्यापासून 80 वर्षांच्या आजोबांनासुद्धा त्याने आपल्या अस्तित्वाची चुणूक लागू दिली नाही. आणि आता तर तो झोपडपट्टीत शिरलाय. अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात, पुणे-मुंबई महामार्गालगत आणि मोठ्या नामांकित मॉलला लागून असलेल्या आनंदनगरमध्ये तर त्याने कहरच केलाय. कारण, एकाच दिवशी त्याने चक्क 18 जणांना झपाटलं. सारा गनिमी कावा म्हणायचा, की निद्रस्थपणाचे सोंग घेऊन नागरिकांना 'बाधा' करायची व आपले उद्दिष्ट साध्य करायचे, अशीच त्याची सध्या रणनिती दिसतेय. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तेव्हा सावध व्हा! आणि घरातच रहा. कारण, साऱ्या जगाचा दुष्मण 'कोरोना' तुमच्या दारापर्यंत पोचलाय. त्याला घरात घ्यायचं नसेल तर, तुम्ही घराचा उंबरठा ओलांडू नका. पिंपरी-चिंचवड शहरातील पहिला रुग्ण दहा मार्च रोजी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल झाला. त्यांच्यासोबत आणखी चार जण होते. पाचही जणांची 'हिस्ट्री' एकच होती. दुबई टूर. एकाच विमानातून प्रवास. पाचही जणांच्या घशातील द्रवाचे नमुने घेतले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवले. अकरा मार्चला रिपोर्ट आले. तीन पॉझिटिव्ह, दोन निगेटीव्ह. महापालिका प्रशासन हादरले. वैद्यकीय यंत्रणा आणखी जोमाने कामाला लागली. वायसीएम व भोसरीतील रुग्णालयात आयसोलेशन कक्ष अगोदरच तयार ठेवलेले होते. पाचही जणांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी सुरू झाली. सर्वेलियन पथकांमार्फत घरोघरी सर्वे सुरू झाला. आणि आणखी एक बॉंब पडावा अशी घटना घडली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रहाटणी व भोसरीतील लग्नाचे वऱ्हाड स्वागत समारंभासाठी थायलंडला गेले होते. ते परतले. त्यातील एका तरुणाला त्रास झाला. तो पॉझिटिव्ह आला आणि तब्बल 90 वऱ्हाडींची तपासणी केली. सुदैवाने त्यांना बाधा झालेली नव्हती. अनेकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. पण, जपान, अमेरिका, युरोपातून शहरात येणाऱ्यांची यादीही मोठी होती. त्यातील चार-पाच जण पॉझिटिव्ह आढळले. आठ दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 12 झाली. आठ-दहा दिवस दिलासादायक केले. कोणीही बाधित आढळले नाहीत. अगोदरच्या तिघांसह अन्य सात जण बरे होऊन घरीही पोचले. अवघ्या दोन जणांवर उपचार सुरू होते. पण, एका धार्मिक कार्यक्रमाहून परतलेला एक रुग्ण बाधित आढळला आणि संख्या वाढू लागली. 

सेवा क्षेत्रातील काही जण पुण्यात कामाला जाणारे होते. काही जण पुण्यातून शहरात कामानिमित्त येणारे होते. यात कायदा-सुव्यवस्था व वैद्यकीय क्षेत्रातील काही सेवक होते. त्यांनाही बाधा झाली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यही बाधित झाले. उपचाराअंती ते बरेही झाले. पण, 'तो' निद्रिस्त अवस्थेत फिरत होता. मध्यमवर्गीयांमध्ये मिसळला होता. आता तर तो 'सोशल डिस्टंसिंग' नावापुरतेच मर्यादीत असलेल्या झोपडपट्टीत शिरला आहे. चिंचवड स्टेशन परिसरातील इंदिरानगर आणि आनंदनगर ही ती ठिकाणे. सोमवारी तर तब्बल 18 जण एकट्या आनंदनगरमध्ये आढळले. एकाच भागात इतक्‍या मोठ्या संख्येने संसर्ग झालेले आढळणे, ही शहरातील पहिलीच घटना. पिंपरी-चिंचवड शहरात 71 झोपडपट्ट्या आहेत. दाट लोकवस्ती. कमी जागेच्या घरात चारपेक्षा अधिक व्यक्ती. तिथे त्याचा शिरकाव रोखण्यासाठी आताच प्रभावी उपाययोजना करावी लागणार. त्याची सुरुवात नागरिक म्हणून आपल्यालाच करावी लागणार आहे. घरातच थांबून. चला तर मग, घरातच थांबू, कोरोनाला हरवू. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com