...म्हणून पिंपरीतील रेशन दुकानदारांनी पुकारला बेमुदत संप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

रेशन दुकानदारांच्या मागण्यांची सरकारने दखल न घेतल्याने ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशनने एक सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.

पिंपरी : रेशन दुकानदारांच्या मागण्यांची सरकारने दखल न घेतल्याने ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशनने एक सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. दुकानदारांनी रेशन वाटप बंद केले आहे. महिन्याच्या एक तारखेपासून रेशन वाटपास सुरवात होते. परंतु, दुकानच बंद असल्याने त्याचा फटका शिधापत्रिकाधारकांना बसतोय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा 

पिंपरी- चिंचवड शहरात 250 रास्तभाव दुकाने असून, चार लाख शिधा पत्रिकाधारक आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने गेल्या सहा महिन्यापासून देशात लॉकडाऊन केले होते. यामुळे अनेकांचे रोजगार बंद झाल्याने रास्त दुकानावरील धान्य फार मदतीचे ठरले. अशा संकटाच्या परिस्थितीत कुणीही गरीब उपाशी राहू नये म्हणून रेशन दुकानदारही आपला जीव संकटात घालून कार्यरत होते. परंतु, सरकारकडून त्यांची दखलही घेतल्या गेली नाही, अशी खंत व्यक्त करून आम्हालाही ""कोविड योद्धा'' म्हणून घोषित करा. यासह प्रत्येक रेशन दुकानदारांचा 50 लाख रुपयांचा विमा काढा, अशा विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी संप पुकारला.

हे वाचा - शांत बेलबाग चौक अन् निवांत पोलिस ; अनंत चतुर्दशीचे दुर्मिळ दृष्य

रेशन दुकानदारांच्या मागण्या सरकारला मान्य नसल्याने, त्यांच्या मागण्यांसंदर्भात अजूनही ठोस निर्णय घेतला नाही. सप्टेंबर महिन्याचा धान्याचा पुरवठा दुकानांमध्ये पोचला असून, दुकानदारांनी या महिन्याचे धान्य वितरण करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गरीब शिधापत्रिकाधारकांचे चांगलेच हाल होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापूर्वी कधीच धान्यसाठा वेळेत आला नाही. संपाची भूमिका घेताच दुकानांमध्ये धान्य पुरविल्याचे खजिनदार विजय गुप्ता यांनी सांगितले. 

""जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे. चार महिन्यापासून मागण्या करत आहोत, पण त्याची साधी दखल घेतली जात नाही. किमान आम्हाला चर्चेला तरी बोलवणे आवश्‍यक आहे. '' 
- गजानन बाबर, अध्यक्ष ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indefinite strike of ration shopkeepers in Pimpri