अपक्ष गटनेते बारणे यांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

अपक्ष गटनेते बारणे यांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

पिंपरी: महापालिकेतील सत्ताधारी भाजपशी संलग्न अपक्ष नगरसेवक आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा: पुणे: बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना तीन लाखांपर्यंतची कामे

थेरगाव गावठाण प्रभाग क्रमांक २३ मधून बारणे यांनी २०१७ च्या निवडणुकीत ते अपक्ष विजयी झाले. १२८ सदस्यांच्या सभागृहासाठी ७७ उमेदवार भाजपचे विजयी झाले. त्यावेळी पाच जण अपक्ष निवडून आले होते. त्यांचा एक स्वतंत्र गट नोंदणी केला होता. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. अपक्षांचे गटनेते म्हणून बारणे यांची निवड झाली. स्थायी समितीचे सदस्यपदीही त्यांची वर्णी लागली होती.

आता फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूक होणार आहे. अवघे साडेपाच महिने बाकी असताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या पक्ष प्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, संतोष बारणे, अभय मांढरे, ऋषिकेश काशीद, योगेश साळुंखे, प्रवीण बारणे, शहाजी लोखंडे, अक्षय बारणे, तुषार मोरे आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे २०१७ च्या निवडणुकीत दरेकर हे बारणे यांचे प्रतिस्पर्धी होते. त्यांच्यासह भाजपचे संभाजी बारणे, कॉंग्रेसचे सहादू गुजर, शिवसेनेचे संपत पवार यांचा पराभव करून कैलास बारणे विजयी झाले होते. त्या वेळी दरेकर हे माजी नगरसेवक व पवार हे विद्यमान नगरसेवक होते.

शिवसेना ते राष्ट्रवादी

कैलास बारणे पंधरा वर्ष शिवसेनेचे कार्यकर्ते होते. माजी खासदार गजानन बाबर यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने तत्कालीन खासदार बाबर यांच्याऐवजी श्रीरंग बारणे यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्या नाराजीतून बारणे यांनी शिवसेना सोडली होती. त्यानंतर २०१७ ची महापालिका निवडणूक लढवली. त्यापूर्वी २००७ ची महापालिका निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली होती. सुमारे ३०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

भाजपला गळती

काही दिवसांपूर्वी प्रभाग २९, सुदर्शननगर पिंपळे गुरवमधील भाजप नगरसेविका व विद्यमान महिला बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे, भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका माया बारणे यांचे पती माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिवाय, भोसरीतील भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी पंधरा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटली घेतली होती. आता कैलास बारणे यांनी प्रवेश केल्यामुळे भाजपला गळती लागल्याचे चित्र आहे.

"भाजप सरकारच्या काळातील पालकमंत्री गिरीश बापट व चंद्रकांत पाटील यांची कारकीर्द मी पाहिली आहे. शहरासाठी त्यांनी काहीही केले नाही. त्या तुलनेत विद्यमान पालकमंत्री अजित पवार हे शहर विकासासाठी झटत आहेत. कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळो अथवा न मिळो राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच काम मी करणार आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार आहे."- कैलास बारणे, नगरसेवक, थेरगाव

Web Title: Independent Group Leader Barne Joins Ncp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NCP