esakal | भारत-चीन तणावाचा 'या' उद्योगाला फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

भारत-चीन तणावाचा 'या' उद्योगाला फायदा

दोन महिन्यापासून गहिरे झालेले कोरोनाचे संकट आणि आता युध्दजन्य परिस्थितीमुळे बिघडलेले संबध, यामुळे देशातील उद्योगांना चीनमधून होणारा कच्च्या मालाचा पुरवठा ठप्प झाला आहे.

भारत-चीन तणावाचा 'या' उद्योगाला फायदा

sakal_logo
By
सुधीर साबळे

पिंपरी : दोन महिन्यापासून गहिरे झालेले कोरोनाचे संकट आणि आता युध्दजन्य परिस्थितीमुळे बिघडलेले संबध, यामुळे देशातील उद्योगांना चीनमधून होणारा कच्च्या मालाचा पुरवठा ठप्प झाला आहे. आताच्या परिस्थितीत भारतामध्ये तयार होणाऱ्या कच्च्या मालाच्या दराच्या किंमतीमध्ये 10 ते 30 तीस टक्‍क्‍यांची वाढ झाली असली, तरी आगामी काळात त्यांना 'अच्छे दिन' येणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

सद्य:स्थिती काय?

इंजिनिअरिंग उद्योगांसाठी आवश्‍यक असणारे प्लेट, पाइप फिटींग, हार्डवेअर, स्टील, ऍलॉय स्टील अशा प्रकारचा कच्चा माल अनेक मोठे उद्योग चीनमधून खरेदी करत होते. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर तिथून येणाऱ्या कच्च्या मालाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली. देशात लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पुन्हा हा कच्च्या मालाचा पुरवठा होण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दोन आठवड्यापासून भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा विषय थांबला आहे. अशातच भारतामध्ये तयार होणाऱ्या या कच्च्या मालाच्या किंमत आणि मागणी या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्वी चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालाचे दर कमी होते. त्यामुळे त्याची खरेदी करण्याला उद्योगांकडून प्राधान्य दिले जायचे. आता या मालाचा पुरवठा करण्याच्या स्पर्धेत चीन नसल्यामुळे देशातील उद्योगांना पूर्णपणे देशात तयार होणाऱ्या कच्च्या मालावरच अवलंबून राहावे लागत आहे. चीनमधून येणारा कच्चा माल आणि भारतात तयार होणारा माल यांच्या दरात देशात तयार होणाऱ्या कच्च्या मालाचे दर अधिक होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या आहेत अडचणी... 

कोरोनाच्या संसर्गामुळे देशात तयार होणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती करण्यासाठी आवश्‍यक असणारे मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. याखेरीज ट्रान्सपोर्टची सुविधा देखील पूर्णपणे उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी कच्चा माल पाठवण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. 

चीनमधून येणाऱ्या मालाची अशी असते प्रतवारी...

चीनमधून येणारा कच्चा मालाची प्रतवारी तीन टप्प्यांमध्ये करण्यात येते. त्यामध्ये प्रथम श्रेणीत उच्च प्रतीचा, दुसऱ्या श्रेणीत मध्यम आणि तिसऱ्या श्रेणीत नाकारलेला कच्चा माल असतो. बऱ्याचदा तिसऱ्या श्रेणीतल्या कच्चा मालाची किंमत कमी असल्यामुळे लहान आणि मध्यम उद्योजकांकडून तो खरेदी केला जायचा. आता तिथून मालच येत नसल्यामुळे उद्योजकांना देशात तयार होणाऱ्या कच्च्या मालावरच अवलंबून राहावे लागत आहे. 

रोजगार वाढीची संधी 

देशात कच्च्या मालाची निर्मिती करण्याचे प्रमाण वाढल्यास त्यामध्ये नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकते. ऑटोमोबाईल उद्योगाला लागणारी लायटनिंग सिस्टिम, वायरिंग हार्नेस या वस्तू चीनमधूनच येतात. त्याच्या निर्मितीला देशात चांगली संधी आहे. 

इथे तयार होतो, देशी कच्चा माल 

कर्नाटक, कानपूर, हरियाणा, मुंबई 
 

इंजिनिअर क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या देशात कार्यरत आहेत. चीनमधून होणारा कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्यामुळे येथील उद्योगांना देशात तयार होणाऱ्या कच्च्या मालावरच अवलंबून राहावे लागत आहे. देशात तयार होणाऱ्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून, ही परिस्थिती काही महिने तशीच राहाण्याची शक्‍यता आहे. 
- बाबासाहेब मोरे, उद्योजक  

loading image
go to top