esakal | तिसऱ्या लाटेबाबत माहिती द्या, घाबरवू नका; राजेश पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Bed

तिसऱ्या लाटेबाबत माहिती द्या, घाबरवू नका; राजेश पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत (Third Wave) लोकांना माहिती (Information) देणे आवश्‍यक आहे. मात्र, त्यांच्यात खूप भितीचे (Panic) वातावरण निर्माण होईल किंवा एकदम गाफील राहणेही चुकीचे ठरेल, याची दक्षता घ्यायला हवी. सोशल मीडियाद्वारे अनेक प्रकारची माहिती दिली जाते. मात्र, या माध्यमाचा गैरवापर होताना दिसतो आहे, तो रोखणे गरजेचे आहे, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. (Inform about the Third Wave dont Panic Rajesh Patil)

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्यातर्फे कोरोनाची संभाव्य लाट रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित संलग्न पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यावर उपाययोजना व खबरदारीसाठी तयारी केली आहे. वायसीएम रुग्णालयातील डॉ. दीपाली अंबिके यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन केली आहे. त्यांच्या मदतीसाठी पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आहे. त्यांच्या माध्यमातून साप्ताहिक कामाचा आढावा घेतला जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने एनआयसीयूतील बेडसंख्या वाढवली आहे. संभाव्य औषधांची व अन्य वैद्यकीय साहित्याची खरेदी केली जात आहे. लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, याबाबत पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.’’

हेही वाचा: वर्षा विहारासाठी आलेल्या पर्यटकांवर लोणावळ्यात कारवाई!

रुग्णालयांत व्यवस्था

पिंपरीतील वायसीएम रुग्णालय पूर्णपणे म्युकरमायकोसिस आणि बालकांसाठी असेल. त्यांचे कोविड केअर सेंटरही तिथे असेल. अन्य आजाराच्या रुग्णांची व्यवस्था अन्य रुग्णालयांत केली जाईल. तसेच, खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाईल.

पथनाट्यांचा वापर

मुलांना कोरोनाची लक्षणे ओळखता यावी, शाळांच्या माध्यमातून मुलांपर्यंत माहिती पोहचावी आणि संभाव्य तिसरी लाट रोखावी, यासाठी शिक्षकांची मदत घेतली आहे. त्यांची पथके नियुक्त केली असून, कार्यवाही सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओ, नाट्यछटा, पथनाट्य या माध्यमातून मुलांना कोरोनाबाबत माहिती दिली जाईल, अशी माहितीही आयुक्त पाटील यांनी दिली.

बेड व्यवस्थापन

  • महापालिकेकडून एक हजार ८०० बेड तयार

  • मुले व मातांसाठी एक हजार कोविड केअर बेड

  • जिजामाता रुग्णालयात १५० बेडची व्यवस्था

  • वायसीएममध्ये बालरोग विभाग व केअर सेंटर

असे आहे वेळापत्रक

  • १ ते १० जूनपर्यंत रूपरेषा ठरवली

  • १० जूनपासून बालकांचे लसीकरण सुरू

असे आहे नियोजन

मुलांसाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी काही मुलांची निवड केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून कोरोना कसा ओळखायचा, काय काळजी घ्यायची याची माहिती अन्य मुलांना दिली जाईल. त्यांच्या मदतीला डॉक्टर असतील.

प्रतिकार क्षमता वाढीसाठी

मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. त्यासाठी शहरातील १० हजार मुलांच्या माध्यमातून प्रतिकार क्षमता तपासून सर्वे केला जाणार आहे. मुलांमधील प्रतिजैविके तपासली जातील. यामुळे उपचार करणे सोयीचे होईल.

loading image