esakal | पिंपरी : तुकोबांच्या पादुका स्थळावर आढळला शिलालेख
sakal

बोलून बातमी शोधा

Tukoba Paduka

पिंपरी : तुकोबांच्या पादुका स्थळावर आढळला शिलालेख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मोशी-आळंदी (Moshi - Alandi) या मार्गावर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) पादुका स्थळावर एक कोरीव मध्ययुगीन शिलालेख आढळून आला आहे, त्यावर ‘तुकाराम बोवा’ असे लिहिले आहे. काळाच्या ओघात अजून काही अक्षरे किंवा कोरीव रेखाटने नष्ट झाल्याची शक्यता आहे. वारीच्या वाटेवर भक्तिभाव वाढीस लागावा आणि क्षणभर विसावा मिळावा म्हणून तुळशीवृंदावन सारखी शिल्पे कोरून प्रतिकात्मक पादुका स्थापन केल्या गेल्या आहेत. (Inscription found Tukobas Paduka site)

मोशी-डुडुळगावच्या शिवेवर असलेल्या ऑस्टीया डेस्टीनेशन येथील संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकास्थळीही शिवलिंग कोरले आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांची समाधी आळंदीमध्ये श्री सिद्धेश्‍वराजवळ आहे म्हणून असे कोरीव काम केले आहे. दोन्ही ठिकाणे एकमेकांपासून अंदाजे १०० मीटर अंतरावर आहेत. माऊलींच्या पादुका स्थळांचा जिर्णोद्धार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने २०१३-१४ मध्ये केल्याचा उल्लेख आढळला आहे. त्यावेळेस पादुका जीर्ण झाल्यामुळे त्यांची हुबेहूब प्रतिकृती आळंदी संस्थानने तयार केली आहे.

हेही वाचा: अक्षय बावस्कर 'Niper JEE'मध्ये दिव्यांग प्रवर्गातून पहिला

मोशी येथील वनस्पती अभ्यासक प्रा. किशोर सस्ते म्हणाले, "संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पादुका स्थानावरील स्थळवृक्षांचा अभ्यास करताना हे शिलालेख आढळले आहेत. स्थळवृक्षांना आणि बरोबरच्या शिल्पांना वारसा स्थळ घोषित करण्याची गरज आहे."

हेही वाचा: "मला जगायचं, मला वाचवा", टेम्पो चालकाची आर्त हाक

अशी निर्माण झाली पादुका ठिकाणे

वारीसाठी आल्यावर सर्वांना छाया मिळावी म्हणून नांदुरकी वृक्षासारखी २५० वर्षे जुने वृक्ष या ठिकाणी आहेत. त्याच्या बुंध्याचा परीघ ४०० सेंमी इतका आहे. खालील बाजूस दगडी शिळांचा चौथरा बांधून त्यावर हे पादुका शिल्प उभारले आहे. सभोवती हिरवळीचे सुशोभीकरण आहे. दोन्ही ठिकाणे ही कोकणातून आळंदीच्या कार्तिकी वारीची विसावा स्थळे आहेत. तुकाराम महाराज पूर्वी मोशी-डुडुळगाव मार्गे आळंदी येथे जात व माऊलींच्या पादुका घेऊन चऱ्होली लोहगाव मार्गे पंढरपुरास जात. हा मार्ग जुन्या पंढरपूर वारीचा आहे. आळंदीच्या चारही बाजूला अशी‌ पादुका ठिकाणे केळगाव, वडगाव घेनंद, सोळू, फुलगाव, चऱ्होली या ठिकाणी आहेत. प्रत्येक ठिकाणी मोठे थोरले स्थळवृक्षे आणि पादुका आहेत.

loading image