esakal | Pimpri : रोकड लुटल्याच्या कटात कामगाराचाच सहभाग
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad crime

Pimpri : रोकड लुटल्याच्या कटात कामगाराचाच सहभाग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी मारहाण करीत कामगाराच्या हातातील सात लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावल्याची घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली. या कटात कंपनीचा कामगारच सहभागी असल्याचे समोर आले असून गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने कामगारासह चौघांना अटक केली आहे.

यश गणेश आगवणे (वय १९, रा. रुपीनगर, तळवडे), कासीम मौला मुर्शिद (वय २१, रा. ओटा स्कीम, निगडी), सागर आदिनाथ पवार (वय १८, रा. ओटा स्कीम, निगडी) , अभिषेक शिरसाट अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी भीमसेन वर्दीसिंग राजपूत यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. राजपूत यांच्या कंपनीत काम करणारे अभिषेक शिरसट व शंकर बिका हे दोघेजण बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास कंपनीचे पैसे घेऊन वाल्हेकरवाडी येथून जात होते. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी अभिषेक याच्या हातातील सात लाख तीन हजार ५६० रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेल्याचा गुन्हा चिंचवड पोलिस ठाण्यात दाखल आहे. या घटनेला कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी आगवणे, मुर्शिद व पवार यांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता फिर्यादीच्या कंपनीतील कामगार शिरसाट हाच या कटात सहभागी असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: पिंपरीत रविवारी लसीचा दुसरा डोस मिळणार ‘ऑन द स्पॉट’

आगवणे याच्याकडून पन्नास हजारांची रोकड व एक मोबाईल, मुर्शीदकडून दीड लाखांची रोकड, एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक मोबाईल तर पवारकडून ६५ हजारांची रोकड व मोबाईल असा एकूण दोन लाख ६५ हजारांचा ऐवज जप्त केला. आरोपींवर कर्ज होते. तसेच त्यांना मौजमजा करणसाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी हा डाव रचला. मुर्शिद व आगवणे यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत .

मला जास्त मारू नका

शिरसाट याने आरोपींना सर्व माहिती दिली. लुटलेल्या पैशातील जास्त हिस्सा शिरसाट याला देण्याचे ठरले होते. तसेच मला जास्त मारू नका मी नंतर तक्रार देण्यास जाईल, असे त्याने आरोपींना सांगितले होते. दरम्यान, गुन्हा घडल्यानंतर शिरसाट स्वतःचाच तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला.

loading image
go to top