esakal | जुलै दिलासादायक; पण निर्बंध कायम
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

जुलै दिलासादायक; पण निर्बंध कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या वर्षीच्या तुलनेत शनिवारी संपलेला जुलै महिना शहरातील कोरोना (corona virus) संसर्गाबाबत दिलासादायक ठरला. गेल्या वर्षी तब्बल २० हजार ३४६ जणांना संसर्ग झाला होता, व २५८ जणांचा बळी गेला होता. आता चार हजार ७४८ जणांना संसर्ग झालेला असून ५८ जणांचा मृत्यू झाला आहे.

तुलनेने संसर्गाची संख्या १५ हजार ५९८ ने आणि बळींची संख्या २०० ने कमी झाली आहे. मात्र, कोरोनाचा संभाव्य धोका व नवीन विषाणूंचा (new veriant) संसर्ग विचारात घेऊन महापालिका आयुक्तांनी निर्बंध कायम ठेवले आहेत.

कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर एक महिन्याने अर्थात १२ एप्रिल रोजी शहरातील पहिला बळी गेला होता. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. लॉकडाउनचे निर्बंध कडक होते. गेल्या मे अखेरपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला होता. हीच संख्या जूनअखेरपर्यंत ७७ झाली होती. जुलै महिन्यात तब्बल २५८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरचे ऑगस्ट व सप्टेंबरही शहरासाठी अधिक चिंताजनक ठरले होते.

हेही वाचा: कोहली-स्मिथ-विलीयमसन : मैदानात प्रखर शत्रू तर बाहेर निखळ मित्र!

मात्र, दिवाळीनंतर रुग्ण व मृत्यूंची संख्याही घटली होती. पण, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने एप्रिल व मे महिने सर्वात धोकादायक ठरले. दिवसाला ४० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत होता. तुलनेने जुलै महिन्यात हे प्रमाण एक किंवा दोन रुग्णांपर्यंत कमी झाल्याने प्रशासनासह नागरिकांनाही सुटकेचा निःश्‍वास सोडला. कारण, जूनमध्येसुद्धा सात हजार ३८९ रुग्णांची नोंद झाली होती. जुलैमध्ये हीच संख्या चार हजार ७४८ पर्यंत कमी झाली आहे.

आयुक्तांचा नवीन आदेश

डेल्टा, डेल्टा प्लस, झिका विषाणूचा संसर्ग आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन शहरात काही प्रमाणात निर्बंध कायम ठेवले आहेत. काही निर्बंध आणखी कठोर करण्याचा आदेश सरकारने दिलेला आहे. त्यानुसार, शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र व खासगी क्लासेस सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सात वाजेपर्यंत केवळ ५० क्षमतेने सुरू राहतील. यापूर्वी दिलेले आदेश कायम राहतील, असा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी रविवारी दिला.

दृष्टीक्षेपात जुलै महिना

एकूण पॉझिटिव्ह : ४७४८

बरे झालेले रुग्ण : ७१२८

मृत्यू झालेले रुग्ण : ५८

नागरिकांचे लसीकरण : ४,४४,४०६

loading image
go to top