esakal | Video : कयाकिंगपटू जुळ्या बहिणी करताहेत घरीच सराव
sakal

बोलून बातमी शोधा

Video : कयाकिंगपटू जुळ्या बहिणी करताहेत घरीच सराव

थेरगाव बोट क्‍लब बंद असल्याने चिंचवड येथील राष्ट्रीय कयाकिंगपटू जुळ्या बहिणी महिन्याभरापासून घरीच कयाकिंगची 'शॅडो प्रॅक्‍टिस' करत आहेत.

Video : कयाकिंगपटू जुळ्या बहिणी करताहेत घरीच सराव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी ः थेरगाव बोट क्‍लब बंद असल्याने चिंचवड येथील राष्ट्रीय कयाकिंगपटू जुळ्या बहिणी महिन्याभरापासून घरीच कयाकिंगची 'शॅडो प्रॅक्‍टिस' करत आहेत. त्यामुळे त्यांना खेळाच्या तंत्रात सुधारणा होण्यास मदत होत आहे. मात्र, स्वतःची कामगिरी उंचाविण्यासाठी नदीवरील पूर्वीसारखा सरावही त्यांना गरजेचा वाटत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव बोट क्‍लब येथे कयाकिंग आणि कनोईंग केंद्र असून तेथे टाळेबंदी लागू होण्यापूर्वी सुमारे 18 ते 20 खेळाडू दररोज सराव करत होते. या सर्व खेळाडूंमध्ये कयाकिंगपटूंचा अधिक समावेश होता. तेथील काही खेळाडू सांगली, कोल्हापूर आणि नांदेड भागांतील देखील होते. बोट क्‍लबवर राहूनच ते खेळाचा सराव करत होते. परंतु, ते आता त्यांच्या गावी परतले आहेत. याच ठिकाणी मागील 9 वर्षांपासून राष्ट्रीय कयाकिंगपटू मानसी आणि मृणाल सावंत या जुळ्या बहिणी देखील सराव करतात. मात्र, सर्वत्र टाळेबंदी लागू झाल्यापासून तेथील सराव पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे, या दोघी त्यांच्या घरातच 'शॅडो प्रॅक्‍टिस' करत आहेत. 

मृणाल म्हणाली, "नदीवर बोटीच्या मदतीने सराव करताना पाणी, हवेचा प्रतिरोधाला सामोरे जात संतुलन साधावे लागते. 'शॅडो प्रॅक्‍टिस'मुळे खेळाच्या तंत्रात सुधारणा होते. परंतु, पाण्यातील सरावच महत्वाचा ठरतो. त्यावेळी, पाणी, हवेचा प्रतिरोध पाहून संतुलन साधावे लागते. त्यामुळे, जितक्‍या लवकर आम्हाला पाण्यात सराव करता येईल तितके ते आमच्या कामगिरीसाठी चांगले राहील.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मानसी म्हणाली, "बोटीत बसण्यापूर्वी देखील आम्ही शॅडो प्रॅक्‍टिस करतो. परंतु, त्यासाठी बोट आवश्‍यक असते. सध्या जिमसहीत सर्वच बंद असल्याने घरीच वजन नियंत्रण, स्नायूंचे बळकटीकरण, सूर्यनमस्कार, योगासने यावर भर देत आहोत.'' 
या दोघींनीही राष्ट्रीय पातळीवरील 6 वेळा सुवर्णपदके पटकाविली असून, चीनमधील ड्रॅगन बोट आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत त्यांचा सहभाग राहिला आहे. अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत त्यांनी 2019 मध्ये ब्रॉन्झपदक मिळविले आहे. मानसी ही एसवाय बीए (सायकोलॉजी) तर मृणाल एसवाय बीबीएचे शिक्षण घेत आहे.

loading image