
आर्थिक व्यवहारातून ऊसतोड कामगार पुरवठादाराचे चौघांनी निगडीतून अपहरण केले.
पिंपरी - आर्थिक व्यवहारातून ऊसतोड कामगार पुरवठादाराचे चौघांनी निगडीतून अपहरण केले. अपहृताच्या नातेवाईकाला फोन करून 'दोन लाख द्या, अन तुमच्या माणसाला घेऊन जा' अशी धमकी दिली. याच फोनच्या लोकेशनवरून पोलिसांनी आरोपींचा माग काढून अपहृताची सोलापुरातील कुर्डुवाडी येथून सुखरूप सुटका केली. तर चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.
अविनाश राठोड (वय ३५) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर गणेश ढोरे, सोमनाथ गायकवाड , समीर गायकवाड, समाधान कांबळे (सर्व रा. रिढोरे ,ता. माढा, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अकोश सोमचंद जाधव (रा. पाटील वस्ती, बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांचे नातेवाईक अविनाश राठोड, विष्णू राठोड, सुनील चव्हाण व इंदल राठोड हे मोटारीतून इंदल राठोड व सुनील चव्हाण यांना त्यांच्या ट्रॅव्हल्समध्ये बसविण्यासाठी निगडीतील कै. मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळ आले होते. ट्रॅव्हल्स गेल्यानंतर फिर्यादी, अविनाश व विष्णू हे मोटारीत बसण्यासाठी गेले असता आरोपी तेथे आले. दोघांनी जबरदस्तीने अविनाश यांना त्यांच्या मोटारीत बसवले. घातपात करण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण केले. तर इतर दोघे फिर्यादीचा आठ हजारांचा मोबाईल व इंदल यांची मोटार जबरदस्तीने घेऊन गेले.
अविनाश हे ऊसतोड कामगार पुरविण्याचे काम करतात. दरम्यान, कामगार पुरविण्यासाठी अविनाश याने आरोपीकडून दोन लाख रुपये घेतले होते. या व्यवहारातून आरोपींनी त्यांचे अपहरण केल्याचे तपासात समोर आले.
...अन आरोपींचा ठावठिकाणा लागला
अपहरणानंतर अविनाश यांना मोटारीतून सोलापूरच्या दिशेने नेत असताना आरोपींनी अविनाश यांच्या एका नातेवाईकाला फोन केला. त्यावर 'दोन लाख द्या, अन तुमच्या माणसाला घेऊन जा' अशी धमकी दिली. याच फोनचे लोकेशन व तांत्रिक विश्लेषनावरून सखोल तपास केला असता आरोपींचा ठावठिकाणा समजला. आरोपी हे अविनाश यांना घेऊन कुर्डुवाडी येथे गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार रात्री सोलापूरला रवाना झालेल्या निगडी पोलिसांनी अविनाश यांची चोवीस तासात सुखरूप सुटका केली.