Kirtan Mahotsav : प्रेम, सेवा, ज्ञानाचं साधन म्हणजे भक्ती - कीर्तनकार यशोधन महाराज साखरे

‘देहू-आळंदीसह विविध भागांतून संतांच्या पालख्यांसमवेत वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत. त्यांची वारी पूर्ण झाली आहे. वारीची परिसीमा भक्तीत आहे.
Kirtan Mahotsav
Kirtan MahotsavSakal

पिंपरी - ‘देहू-आळंदीसह विविध भागांतून संतांच्या पालख्यांसमवेत वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत. त्यांची वारी पूर्ण झाली आहे. वारीची परिसीमा भक्तीत आहे. भक्ती म्हणजे भगवंताविषयी उत्कट प्रेम, मनोभावे सेवा आणि ज्ञानाचं साधन आहे,’ असे प्रतिपादन आळंदी येथील कीर्तनकार यशोधन महाराज साखरे यांनी केले.

निमित्त होते, आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे.

आषाढी वारीसाठी देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळे बुधवारी (ता. २८) सायंकाळी पंढरपूरमध्ये पोहोचले. त्यातील काही वारकऱ्यांनी गुरुवारी आषाढी एकादशीला प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मंदिरात गाभाऱ्यापर्यंत जाऊन दर्शन घेतले. कोणी मुखदर्शन, कोणी पायरी दर्शन तर कोणी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. मात्र, जे भाविक पंढरपूरला किंवा वारीला जाऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी ‘सकाळ’ने सोमवारपासून (ता. २६) चार दिवसांचा कीर्तन महोत्सव आयोजित केला होता. गुरुवारी समारोपाचे कीर्तन यशोधन महाराज साखरे यांनी केले. त्यात त्यांनी संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांच्या,

Yashodhan Maharaj Sakhare
Yashodhan Maharaj SakhareSakal

माझे जिवींची आवडी ।

पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥

पांडुरंगी मन रंगले ।

गोविंदाचे गुणीं वेधलें ॥धृ॥

जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे ।

पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥

बापरखुमादेविवरू सगुण निर्गुण ।

रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥ ...

या अभंगाचे निरूपण केले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी आणि संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींचे आणि ‘भगवद्‌गीता’, ‘ज्ञानेश्वरी’ आणि संत तुकाराम महाराज यांच्या ‘अभंगांची गाथा’ या ग्रंथाचे पूजन आणि दीपप्रज्वलन साखरे महाराज यांच्या हस्ते झाले.

त्यानंतर ‘माझे जिवींची आवडी।’ या अभंगाचे निरूपण करताना ते म्हणाले, ‘आज आषाढी एकादशी आहे. पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात दिंड्या, पताका नाचत आहेत. आजचा दिवस हा हरी दिवस आहे. आजच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करायचं असतं, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असतं आणि हरी कथा ऐकायची असते. तो योग आज ‘सकाळ’मुळे जुळून आला आहे.

या कीर्तन महोत्सवात लावलेल्या भगव्या पताका महत्त्वाच्या आहेत. कारण, वारीत भगवी पताका ही वारकऱ्याची अस्मिता असते. ती त्यागाचे प्रतीक आहे. माउलींनीसुद्धा हातात पताका घेऊन पंढरपूरच्या वारीला जावे, असे सांगितले आहे. त्यांचे मन त्या पंढरीरायाचे वर्णन ऐकून रंगून गेले आहे. जागृती, स्वप्नी त्यांना पांडुरंग दिसतो आहे. ज्याच्या रूपाकडे पाहताच आनंदी आनंद होतो. त्याचं सगुण-निर्गुण रूप विटेवरी उभं आहे. ही वीट म्हणजे भगवंत ओळखण्याची खूण आहे.’

‘सकाळ’ने वारी घडवून आणली

समाज वेगाने प्रगती करत आहे. त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. ती देण्याचे योग्य माध्यम कीर्तन आहे. भगवंताचे नामस्मरण आहे. ही दिशा संतांनी दाखवली आहे. त्यामुळे ज्या दिशेने संत गेले, त्या दिशेने आपण चाललं पाहिजे. नेमकं हेच व्रत ‘सकाळ’ने घेतले आहे. आषाढी वारीनिमित्त त्यांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

म्हणजेच समाजाला दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘सकाळ’ने केला आहे. शिवाय, त्यांचं बोधचिन्ह ‘ओम्’ आहे. त्या ‘ओम्’ला अनुसरून ही कीर्तनसेवा घडत आहे. या माध्यमातून ‘सकाळ’ने आपली सर्वांची, जे पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, त्यांची वारी पूर्ण केली आहे,’’ असे प्रतिपादन यशोधन महाराज साखरे यांनी केले.

महोत्सवासाठी अनमोल सहकार्य

‘सकाळ’च्या कीर्तन महोत्सवास महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव जयंत ऊर्फ अप्पा बागल, राष्ट्रीय कुस्ती पंच वस्ताद विजय नखाते, इंदुरी येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण काशीद, साहित्यिक विद्या काशीद यांचे सहकार्य लाभले. आळंदी येथील राजाराम महाराज देवळकर (पखवाज), रवी महाराज पवार आणि उद्धव महाराज शिंदे (गायन), भोसरीतील संतोष थोरात व भानुदास गलांडे (चोपदार) आणि आळंदी येथील संगीत साधना गुरुकूलचे विद्यार्थी (टाळ) यांची सेवा लाभली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com