कोटक बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांच्यासह सहा जणांवर लोणावळ्यात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोटक बॅंक

कर्जावर जादा दराने व्याज आकारणी तसेच कर्ज मंजूर पत्रावर बनावट सही, शिक्क्यांचा वापर करत ग्राहकाची फसवणूक केली.

मोठी बातमी! कोटक बॅंकेचे MD उदय कोटक यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

लोणावळा - कर्जावर जादा दराने व्याज आकारणी तसेच कर्ज मंजूर पत्रावर बनावट सही, शिक्क्यांचा वापर करत ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी कोटक-महिंद्र बॅंकेचे (Kotak Mahindra Bank) व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक (Uday Kotak) यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोटक यांच्यासह बॅंकेच्या लोणावळा शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक व्हली फर्नांडिस, कर्मचारी सांप्रद कामत, अंबर दरबारी, अलंकार खरे, अभिजित मगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी येथील हॉटेल व्यावसायिक अशोक भोपालसिंग पुरोहित (वय ५८, रा. लोणावळा) यांनी लोणावळा पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार अशोक पुरोहित यांनी त्यांचे कुमार रिसॉर्ट आवारातील दोन गाळे २०१३ मध्ये कोटक बॅंकेस भाडेतत्वावर दिले होते. त्यानंतर बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी बॅंकेत खाते उघडण्यासाठी विनंती केल्यावर अशोक पुरोहित व त्यांचे बंधू सुरेश पुरोहित यांनी बॅंकेत खाते उघडले.

हेही वाचा: पिंपरी महापालिकेत मनुष्यबळ कमी; कंत्राटी कामगारांवर मदार

काही दिवसांनंतर बॅंकेचा व्यवसाय वाढावा यासाठी बॅंकेतून व्यवसायासाठी कमी व्याज दराने कर्ज देतो, असे प्रलोभन देत कर्ज घेण्यासाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी पुरोहित यांना आवाहन करीत ६२ लाख ८६ हजार ३५६ रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर २०१४ मध्ये अशोक पुरोहित यांना व्यवसायासाठी पुन्हा तीन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. कर्जापोटीचे हप्तेही पुरोहित यांनी भरले. २०१८ मध्ये अर्जासंदर्भात कागदपत्रांची मागणी केल्यानंतर पुरोहित यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. मात्र, कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

अशी झाली फसवणूक

पहिल्या कर्ज प्रकरणात अशोक पुरोहित यांनी भाड्याने दिलेल्या गाळ्यांवर ‘लिज रेंटल डिस्काउनटिंग’नुसार १०.३० टक्के व्याज दरानुसार कर्जप्रकरण मंजूर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ‘लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी’नुसार कर्ज मंजूर करीत १२ टक्के दराने व्याज आकारणी करण्यात आली. दुसऱ्या कर्ज प्रकरणात ११.३० टक्यांऐवजी ११.५० टक्के दराने व्याज आकारणी करीत २० ते २५ लाखांची फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार पुरोहित यांनी केली. कर्ज प्रकरण मंजूर करताना अशोक पुरोहित व त्यांचे बंधू सुरेश पुरोहित यांच्याशी संबंधित कंपनीचे बनावट शिक्के व सह्यांचा वापर करण्यात आला, असे पुरोहित यांचे म्हणणे आहे.

Web Title: Kotak Bank Managing Director Uday Kotak And Six Others People Crime In Lonavala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top