पुण्यातील मावळ तालुक्यात रेमडिसिव्हिरसाठी रुग्णाच्या नातेवाईकांची दमछाक

remdesivir
remdesivir

तळेगाव स्टेशन : मावळ तालुक्यातील कोविड रुग्णालयांमधील मेडिकल स्टोअर्सकडून होत असलेल्या रेमीडेसेव्हर इंजेक्शन्स विक्री आणि उपलब्धतेवर अन्न आणि औषध प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने कुठलीही पारदर्शकता राहिलेली नाही. परिणामी रेमडिसिव्हिरसाठी रुग्णाच्या निकटवर्तीयांची दमछाक होत आहे. स्थानिक रुग्णांच्या नावावरील रेमडिसिव्हिर इंजेक्शन्स अव्वाच्या सव्वा दराने बाहेर विक्री केली जात असल्याचा आरोप रुग्णांकडून केला जात आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त ठरलेली रेमडिसिव्हिर औषधाची इंजेक्शन्स मावळ तालुक्यात सहजासहजी मिळत नसल्यामुळे कोविड रुग्णांसह निकटवर्तीयांनी नाहक हेळसांड होते आहे. कोविड अहवाल सकारात्मक आल्यानंतर रुग्णास कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. अतीजवळच्या संपर्कांतील कुटुंबीय आणि कधीकधी जवळचे मित्रही होम क्वारंटाईन केले जातात. अशा वेळी हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णाला ऐनवेळी लागणारी औषधे, हॉस्पिटल आणि मेडिकलची देयके आदींसाठी ऐनवेळी मदत कार्याला कुणी राहत नाही. केवळ कोविड हॉस्पिटलशी संलग्न मेडिकल स्टोअर्सना गरजेनुसार रेमडिसिव्हिर इंजेक्शन्स मागवून विकण्याची मुभा आहे.तळेगाव आणि सोमाटणे परिसरात मिळून जवळपास आठ कोविड हॉस्पिटल्स सध्या कार्यान्वित आहेत.

मावळसह शेजारील खेड, मुळशी, रोहा आणि पिंपरी चिंचवड पुण्यातील रुग्णही येथे उपचार घेताना दिसतात. मात्र रेमडिसिव्हिर इंजेक्शन्स बाबत कुठलीही पारदर्शकता नसल्यामुळे साठेबाजी आणि अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात असल्याबाबत रुग्णांच्या तक्रारी वाढल्या आहेत. इंजेक्शनसाठी मूळ किमतीच्या चार ते पाच पट पैसे रोखीने अथवा वैयक्तिक खात्यावर फोन पे द्वारे आगाऊ घेतले जातात. बिलाची मागणी केल्यास केवळ शासन निर्धारित दराचेच बिल माथी मारले जाते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कोविड रुग्णांसह नातेवाईकांची आर्थिक लूट चालू असल्याचे चित्र आहे. मावळातील कोविड हॉस्पिटलमधील रेमडिसिव्हिर इंजेक्शन्सची दैनंदिन आवक जावक आणि उपलब्धता आपत्ती निवारण कक्षाने अथवा अन्न आणि औषध प्रशासनाने जाहीर करावी.तसेच वाढीव किमतीचा काळाबाजार थांबवून कोविड रुग्णांसह नातेवाईकांना न्याय द्यावा अशी मागणी आहे.
हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!
एरव्ही दिवाळी दसऱ्याला मावळात तोंड दाखविणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी सध्याच्या आपत्कालीन परीस्थितीतही रेमडिसिव्हिर इंजेक्शन्सच्या उपलब्धता आणि वितरणाबाबत गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे तालुका आपत्ती निवारण कक्षाने हा विषय आपल्या नियंत्रणाखाली घेऊन काळाबाजार रोखून गरजूंना रेमडिसिव्हिर उपलब्ध करून द्यावीत.

- श्रीकांत वायकर (नागरिक)

शासकीय कोट्यातून रेमीडेसेव्हर इंजेक्शन्स विक्रीसाठी परवानगी आणि उलब्धता लाभल्यास ना नफा ना तोटा तत्वावर गरजूंना विक्री सेवा उपलब्ध करुन देता येईल.

- सुनील जैन (मेडिकल व्यावसायिक,तळेगाव स्टेशन)

विकत घेतलेल्या किमतीवर जास्तीत जास्त १० टक्के अधिभार लावून रेमडिसिव्हिरची विक्री करण्यास परवानगी आहे. मुळात उत्पादक कंपन्यांकडूनच मागणीच्या तुलनेत अपेक्षित पुरवठा होत नसल्यामुळे  सध्या रेमीडेसेव्हरचा तुटवडा भासतो आहे.त्यामुळे डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन, कोविड रिपोर्ट, आधार कार्डची खातरजमा करूनच एका रुग्णासाठी एकच इंजेक्शन अदा केले जाते त्यामुळे काळा बाजाराची शक्यता नाही. मात्र,काहीजण एकापेक्षा अधिक इंजेक्शनची मागणी करतात त्यामुळे अडचण होते.अन्न आणि औषध प्रशासनाचे रेमडिसिव्हिर वितरणावर पूर्णपणे नियंत्रण आहे.

- प्रमोद पाटील (औषध निरीक्षक,पुणे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com