esakal | 'देशात लोकशाही रुजली, पण बंधुता रुजलेली दिसत नाही' 
sakal

बोलून बातमी शोधा

'देशात लोकशाही रुजली, पण बंधुता रुजलेली दिसत नाही' 

- फेसबुक व युट्युबच्या माध्यमातून १२ हजार नागरिकांचा सहभाग

'देशात लोकशाही रुजली, पण बंधुता रुजलेली दिसत नाही' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : "परकीय आक्रमणं होत असताना आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता, संविधान, राष्ट्रध्वज या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. जसे भारतीय संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, समता याला महत्व आहे, तेवढंच महत्व सामाजिक न्यायाला आहे. सध्या लोकशाही देशात रुजली. परंतु, बंधुता रुजलेली दिसत नाही," असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 

पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून  १ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान वेबिनारद्वारे आयोजित केलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचारप्रबोधन पर्व-२०२० चौथ्या दिवशी 'सामाजिक न्याय समीक्षा' या विषयावरील परिसंवादामध्ये ते बोलत होते.

सबनीस म्हणाले, की भारत सुरक्षित राहिल्याशिवाय देशातील सर्व समाज सुरक्षित राहू शकत नाही. आजच्या काळामध्ये आर्थिक समानतेचा न्याय देशातील गोरगरिबांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी देशांतर्गत शांतता असणे आवश्यक आहे. बाह्य आक्रमणापासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपली एकजूट दाखवणे आवश्यक आहे. पाकिस्तान व चीनसारख्या देशांचा आपण एकत्र येऊन प्रतिकार केल्याशिवाय भारतीय संविधानाला अपेक्षित असलेल्या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला आपण न्याय देऊ शकत नाही. ७० वर्षांमध्ये म्हणूनच जातीच्या मिती आजही समाजामध्ये दिसून येत आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत भाकरी पोहोचत नाही, त्याला माणूस म्हणून समाजामध्ये स्थान देता येणार नाही. तोपर्यंत भारतीय संविधानाचा ध्येयवाद अपुरा राहणार आहे. अण्णा भाऊ साठे यांची नाळ स्वामी विवेकानंद यांच्याशी जुळत असल्याचेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इतर वक्ते काय म्हणाले...

अजित केसराळीकर म्हणाले, "देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊनही देशामध्ये समता प्रस्थापित झालेली दिसून येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून पंचसुत्रीद्वारे सामाजिक न्याय देणारी लोकशाही या देशाला अर्पण केली. देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी जाती व्यवस्था नष्ट करणे आवश्यक आहे."

अॅड. भूपेंद्र शेडगे म्हणाले, "अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे यांच्या माध्यमातून जी पात्रे उभी केली, ती स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी जवळीक साधणारी होती. अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजातील प्रत्येक घटकाला एक आकार दिला आहे. अण्णा भाऊ साठे यांचा एक पोवाडा ऐकून रशियातील लोक जागृत होऊन आपल्या देशात अध्ययनासाठी येतात. आपण देखील त्यांच्या साहित्यातून प्रेरित होणं आवश्यक आहे. साठे यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक न्यायाची भूमिका मांडल्याचे दिसून येते."

अॅड. श्रीधर कसबेकर म्हणाले, "सामाजिक न्यायाची चिकित्सा करणे आज आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला आहे का, हे पाहणं आवश्यक आहे.  अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यापासून प्रेरित होऊन अनेक साहित्यिक निर्माण झाले."

पर्व २०२० च्या दिवसाची सुरुवात वादक सोनू काळोखे यांच्या पारंपरिक सनई वादनाद्वारे झाली. त्यानंतर महादेव खंडागळे आणि संच यांच्या प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाने प्रबोधनाच्या चौथ्या दिवसाची सांगता करण्यात आली. यावेळी अतिरिक आयुक्त प्रवीण तुपे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष दतु चव्हाण, सचिव संजय ससाणे, कार्याध्यक्ष नितीन घोलप, खजिनदार शिवाजी साळवे, मुख्य संघटक मेघराज साळवे, भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, प्रा . धनंजय भिसे, हनुमंत कसबे, मनोज तोरडमल, अरुण जोगदंड उपस्थित होते .