गांधींच्या पुतळ्यासाठी महापालिकेच्या सभागृहात ठराव मंजूर होतो, पण नंतर त्याला केराची टोपली दाखवली जाते

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 January 2021

सर्वोदय, ग्रामराज्य आणि रामराज्यासारखी संकल्पना जगाला देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारा, अशी मागणी घेऊन एक निवृत्त शिक्षक अकरा वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवत आहे. सभागृहात ठराव मंजूर होतो, पण नंतर त्याला केराची टोपली दाखवली जाते.

पिंपरी - सर्वोदय, ग्रामराज्य आणि रामराज्यासारखी संकल्पना जगाला देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारा, अशी मागणी घेऊन एक निवृत्त शिक्षक अकरा वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवत आहे. सभागृहात ठराव मंजूर होतो, पण नंतर त्याला केराची टोपली दाखवली जाते. तरीही हताश न होता ते नगरसेवकांपासून अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन पाठपुरावा करत आहेत. आता पुण्यतिथीनिमित्त शनिवारपासून (ता. ३०) स्वाक्षरी मोहिमेसाठी ते चौकाचौकात उभे राहणार आहेत. या लढवय्याचे नाव बी. आर. माडगूळकर असून, ते ६८ वर्षांचे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरीमधील मोरवाडी, म्हाडा वसाहतीमध्ये माडगूळकर राहतात. नियोजित महात्मा गांधी पुतळा स्मारक समितीचे ते निमंत्रक आहेत. शालेय दशेत त्यांना गांधीजींचा अहिंसेचा मार्ग भावला. यातून कार्यपद्धती, विचारांनी प्रेरित होऊन गांधी विचारांचा प्रचारक बनून शहरभर ते व्याख्याने देतात. गांधी पुण्यतिथीनिमित्त ‘सकाळ’ने त्यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले, ‘‘पुतळा स्मारक शहरात हवे, ही माझी आग्रही मागणी आहे. शहरात गांधीजींच्या पाऊलखुणा आहेत. आठवणी आहेत. त्यांचा पुतळा होण्यासाठी मी अकरा वर्षांपासून महापालिकेत जातो आहे. ठराव मंजूर होऊनही विषय दुर्लक्षित ठेवला आहे. त्याचे स्मरण व्हावे यासाठी मी दरवर्षी ३० जानेवारीला पुण्यतिथीनिमित्त मागणी करत विविध मोहीम राबवितो. यावर्षी सह्यांची मोहीम राबविली आहे.

पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का

मोरवाडीतील बाफना कंपनीच्या परिसरात गांधीजी येऊन गेल्याची नोंद शहराच्या इतिहासात आहे. चिंचवड रेल्वे स्थानकावर ते उतरले. चरख्यावर विणलेल्या सुताचा हार देऊन कार्यकर्त्यांनी कसा सत्कार केला, अशा मजकुराचा फलक साक्षीदार होता. परंतु, स्थानक नूतनीकरणात तो फलक काढून ठेवण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खर्च बिर्ला ग्रुप करणार, तरीही उदासीनता
आदित्य बिर्ला ग्रुपच्या संचालक राजश्री बिर्ला यांनी १२ डिसेंबर २०१८ रोजी महापालिकेला पत्र पाठविले होते. त्यामध्ये पालिकेने किमान दोन एकर जागा उपलब्ध करून दिल्यास गांधी स्मारकाचा संपूर्ण बांधकाम आणि देखभाल दुरुस्ती खर्च आम्ही करू. जागेचा व स्मारकाचा ताबा पालिकेकडे राहील, असे नमूद केले होते. त्यानुसार, बिर्ला ग्रुपला पिंपरीतील सिटी सर्व्हे क्रमांक ४६९४ मधील मंजूर बांधकाम रेखांकनातील सुविधा भूखंड व महावितरणच्या उपकेंद्रासाठी आरक्षित असलेले ६८०६ चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध करण्यास ‘स्थायी’ची मान्यता मिळाली आहे.

ठराव मंजूर, पण कार्यवाही शून्य
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत १९ जून २०१९ रोजी पुतळा बांधण्याविषयी ठरावाला मान्यता दिली. त्यासाठी पुणे-मुंबई जुना महामार्गावर भूखंड मंजूर केला आहे. सध्या या जागेवर अतिक्रमण झाले अाहे. अतिक्रमण हटवून भूखंडाला सीमाभिंत बांधणे आवश्‍यक आहे. दर्शनी भागावर ‘सदरचा भूखंड महात्मा गांधी पुतळा स्मारकासाठी राखीव असून या जागेवर आक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू.’ अशा फलकाची गरज आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahatma Gandhi Statue Permission retired teacher signature campaign