लॉकडाउननंतर सलून व्यवसाय उभारी घेणार का? काय असेल आव्हान...वाचा

अवधूत कुलकर्णी
Sunday, 17 May 2020

सर्वांनाच टापटीप राहण्याची सवय असते. त्यासाठी आपले केस व्यवस्थित कापले आहेत ना, दाढी चांगली झाली ना, याची काळजी लोक घेत असतात.

पिंपरी : सर्वांनाच टापटीप राहण्याची सवय असते. त्यासाठी आपले केस व्यवस्थित कापले आहेत ना, दाढी चांगली झाली ना, याची काळजी लोक घेत असतात. पण हे सर्व करणारे नाभिक व्यावसायिकही आर्थिक तंगीचा सामना करू लागले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील नाभिक व्यावसायिकांच्या स्थानिक संघटना आहेत. चिंचवड, भोसरी, निगडी, पिंपरी, आकुर्डी, थेरगाव, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर अशा ठिकाणच्या संघटना स्वतंत्र आहेत. लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून हा व्यवसायही बंद आहे. या क्षेत्रातील कामगारांपुढेही जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एका व्यावसायिकाला दिवसाला साधारणपणे दोन ते तीन हजार रुपये मिळतात. यामध्ये केवळ 20 टक्के कामगार महाराष्ट्रीयन आहेत. पारंपरिक कटिंग सलूनप्रमाणे नामांकित ब्रॅण्डच्या सलूनमध्ये जाण्याचीही तरुणांमध्ये क्रेझ आहे. अशा सलूनमध्ये स्वच्छता, टापटीप जास्त असते. त्याचप्रमाणे विशेष प्रशिक्षण घेतलेले कारागीरही तेथे कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्या सेवांचे शुल्कही जास्त असते. 

दोघेही पुण्याचे लढवय्ये; एक 80 वर्षांचा तर दुसरा 30 वर्षांचा, दोघेही जिंकले

परप्रांतीयांचे आधिक्‍याचे कारण...

 या कारागिरांना त्यांच्या राज्यात महिन्याला केवळ दोन ते तीन हजार रुपये मिळतात. याउलट महाराष्ट्रात जेवणाच्या सोयीसह महिन्याला सात ते दहा हजार रुपये मिळतात. त्यामुळे हे कारागीर महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये रोजगारासाठी जातात. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउननंतरचे आव्हान 

या व्यवसायात 80 टक्के बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथून आलेले कारागीर आहेत. लॉकडाउनमुळे यापैकी अनेकजण गावी निघून गेले आहेत. प्रत्येक व्यावसायिकाकडे साधारणपणे दोन ते पाच कारागीर असतात. सरकारने या व्यावसायिकांना परवानगी दिल्यानंतर पुरेशा कारागीरांअभावी त्यांना ग्राहकांची सेवा करणे अवघड होणार असल्याचे चित्र आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दृष्टिक्षेपात...सलून व्यवसाय

  • व्यावसायिकांची संख्या : 1000 ते 1200 
  • नामांकित ब्रॅण्डच्या व्यावसायिकांची संख्या : 100 ते 150 
  • महिन्याची उलाढाल : 30 लाख रुपयांहून अधिक 
  • व्यवसायातील कामगारांची संख्या : चार ते पाच हजार 

सलून व्यावसायिकांकडे काहीजण मद्य पिऊनही येतात. त्यामुळे त्यांना काही समजावणेही व्यावसायिकांना डोईजड होऊ शकते. त्यामुळे सरकारने सलून व्यावसायिकांना व्यवसायाची परवानगी दिल्यानंतर ग्राहकांनीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करायला हवे. 

- प्रवीण कारेकर, अध्यक्ष, नाभिक संत सेना मंडळ, चिंचवड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news about mens saloon business close due to lockdown