मावळ तालुक्यातील दहावीच्या निकालासाठी वाचा सविस्तर वृत्त    

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जुलै 2020

-मावळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.१६%;                      

-४६ शाळांचा निकाल शंभर टक्के                        

वडगाव मावळ : मावळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.१६ टक्के लागला आहे. तालुक्यातील ८० शाळांमधील ४ हजार ७९६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ४ हजार ७०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४६ शाळांचा निकाल शंभर टक्के तर २१ शाळांचा निकाल ९५ टक्क्यांच्या पुढे लागला. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये शहरी भागातील १९ तर ग्रामीण भागातील २७ शाळांचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (डिस्टिंक्शन ) मिळवले. १ हजार ९१७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १ हजार ७८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

वडगावमध्ये मुलींची बाजी- रयत शिक्षण संस्थेच्या येथील न्यू.इंग्लिश स्कुलचा दहावीचा निकाल ९४.७३ टक्के तर श्री.रमेशकुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कुलचा निकाल १०० टक्के लागला. न्यू.इंग्लिश स्कुलमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम तीनही क्रमांक मुलींनी पटकावले. श्रावणी संजय गोळे ही विद्यार्थिनी ९५% गुण मिळवून प्रथम, मुग्धा प्रकाश शिंदे व संज्योत चंद्रकांत खांदवे या विद्यार्थिनी ९४.६०% गुण मिळवून द्वितीय तर रेवती सुरेश आगळमे ही विद्यार्थिनी ९३.४०% गुण मिळवून शाळेत तिसरी आली.

स्कुल कमिटी सदस्या माजी आमदार रुपलेखा ढोरे, मनोज ढोरे, प्राचार्य उद्धव होळकर, उपमुख्याधिपिका मृणालिनी अनारसे, पर्यवेक्षक पोपट कांबळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. श्री.रमेशकुमार सहानी इंग्लिश मिडीयम स्कुलचा निकाल सलग सहाव्या वर्षी १०० टक्के लागला. मृणाल रमाकांत गटकुल याने ९३.८० टक्के गुण मिळवून प्रथम, तेजश्रीराजे हनुमंत पानसकर याने ९२.८०% गुण मिळवून दुसरा तर मंदार सुनील शिंदे याने ९२.६०% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. त्याने गणित विषयात ९९ गुण मिळवले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर, उपाध्यक्ष नारायण ढोरे, सचिव नंदकुमार ढोरे, प्राचार्या टी. एन.साईलक्ष्मी, व्यवस्थापक आदिनाथ आगळमे, आसावरी मुंगीकर आदींसह संचालक मंडळाने विद्यार्त्यांचे अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maval taluka tenth result 98.16%