मावळचे तहसीलदार आढळले पॉझिटिव्ह; आजची महत्त्वाची बैठक झाली रद्द

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने गुरुवारी (ता. 3) निगडे येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.

कामशेत (ता. मावळ) : मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने गुरुवारी (ता. 3) निगडे येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे एमआयडीसी टप्पा क्र.4 मधील निगडे, आंबळे, कल्हाट, पवळेवाडी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही बैठक होणार होती. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कामशेतकरांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

निगडेचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित केली होते. या बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार होते. या बैठकीत आंबळे, निगडे, कल्हाट, पवळेवाडीतील शेतकऱ्यांच्या समस्या आणि म्हणणे जाणून घेण्यात येणार होते. या बैठकीला येणाऱ्या शेतकऱ्यांनी मास्कचा वापर करावा, बैठकीच्या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे ठरले होते. त्यादृष्टीने तयारी झाली होती. एमआयडीसीच्या अनुषंगाने येणाऱ्या समस्यांचा निपटारा होईल, या अपेक्षेने शेतकरी बैठकीला येणार होते. मात्र, तहसीलदार बर्गे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते होम क्वांरटाइन आहेत. त्यामुळे आजची बैठक रद्द करण्यात आली असून, बैठकीची पुढील तारीख कळव जाईल, असे सरपंच मोहन घोलप यांनी सांगितले. 

गणपती विसर्जनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये 'हा' झाला बदल

घोलप म्हणाले, "तळेगाव दाभाडे एमआयडी टप्पा क्रमांक चारसाठी निगडे, आंबळे, कल्हाट व पवळेवाडीतील सुमारे दोन हजार हेक्‍टर जमिनीचे संपादन अपेक्षित आहे. संपादनाच्या अनुषंगाने एमआयडीसीचे अधिकारी व शेतकरी कृती समितीच्या अनेक बैठका झाल्या आहेत. संपादित जमिनीला योग्य बाजारभाव मिळावा, बागायती क्षेत्र संपादनातून वगळावे, अशा अनेक मागण्यांना सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांना आणि येथील तरुणांना नोकरी आणि व्यवसायात प्राधान्य द्यावे, ही आमची मागणी कायम आहे. आजच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाणार होती.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maval tehsildar positive, today's important meeting canceled