Video : पिंपरी-चिंचवडमधील एवढे परप्रांतीय आज गावी परतले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

पुणे रेल्वे स्थानक आणि उरुळी कांचन येथे सोडण्यासाठी 'पीएमपीएमएल'ने जवळपास 1 हजार 64 बसगाड्यांची व्यवस्था केली. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरामधून परप्रांतीय स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर, विद्यार्थी यांचे मूळगावी परतणे सुरुच असून, मागील दीड आठवड्यांपासून आतापर्यंत जवळपास 24 हजारांपेक्षा जास्त परप्रांतीय लोक रेल्वेने गावी पोचले आहेत. या लोकांना पुणे रेल्वे स्थानक आणि उरुळी कांचन येथे सोडण्यासाठी 'पीएमपीएमएल'ने जवळपास 1 हजार 64 बसगाड्यांची व्यवस्था केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात पोलिस आयुक्तालयाअंतर्गत 15 पोलिस ठाणे कार्यरत आहेत. परप्रांतीय लोकांच्या अर्जाची पडताळणी, वैद्यकीय प्रमाणपत्रांची खातरजमा झाल्यावर पोलिसांकडून आदल्या दिवशी 'पीएमपी' बसगाड्यांची मागणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बसगाड्या संबंधित पोलिस ठाणे अथवा चौकीवर पाठविल्या जातात. प्रत्येक गाडीत सरासरी 22 ते 25 प्रवाशांना बसवून त्यांना पीएमपीने पुणे रेल्वे स्थानक अथवा ऊरुळी कांचन येथील रेल्वे स्थानकावर सोडले जात आहे. 

पीएमपीचे समन्वयक अधिकारी संतोष माने म्हणाले, "पीएमपीच्या भोसरी, निगडी आणि पिंपरी आगारामधून दररोज सकाळी आणि दुपारच्या वेळेस सरासरी 35 ते 40 बसगाड्या पाठविल्या जात आहेत. रेल्वेगाड्यांच्या वेळेनुसार आम्हीदेखील बसगाड्यांचे नियोजन करत आहोत. पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण, हिंजवडी, म्हाळुंग आदी भागांमधून उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड, आसाम यासारख्या राज्यांमधील लोकांची पाठवणी करण्यात आली आहे. नियोजित रेल्वेगाडीच्यावेळेअगोदर 3 तास सर्व लोकांना स्थानकावर पोचविले जात आहे. आतापर्यंत 19 रेल्वेगाड्यांमधून जवळपास 24 हजार 700 परप्रांतीय लोक त्यांच्या मूळगावी परतले आहेत. त्यांना पुणे रेल्वे स्थानक आणि ऊरळी कांचनपर्यंत सोडण्यासाठी 1 हजार 264 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाच हजार लोक शुक्रवारी रवाना 

विविध पोलिस ठाण्यांकडून पडताळणी केल्यानंतर पीएमपीच्या तीनही आगारामधून 212 बसगाड्या पाठविण्यात आल्या. 4 रेल्वेगाड्यांतून सुमारे 5 हजार परप्रांतीय त्यांच्या गावी रवाना झाले. पोलिसांकडून पुढील सूचना येईपर्यंत ही मदत चालू ठेवली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migrants people leave Pimpri-Chinchwad by train