देशविरोधी कृत्यांचा विरोध करा; प्रकाश जावडेकर यांचे युवकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 55 व्या प्रदेश अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी जावडेकर बोलत होते.

पिंपरी : "समाजहित विरोधीकामे करून काही जण व परकीय शक्ती देशाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे उघड झाले आहे. मात्र, देश शक्तिशाली आहे. लोक मजबूत आहेत. अशा षडयंत्रांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. अशा आव्हानांचा सामना करीत युवकांनी सतर्क राहून चांगल्या परिवर्तनासाठी साथ द्यायला हवी. वाईट कृत्यांचा विरोध करायला हवा. त्यांच्यामुळेच देश प्रगती करीत आहे,'' असे मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 55 व्या प्रदेश अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी जावडेकर बोलत होते. महापौर उषा ढोरे, ज्येष्ठ समाजसुधारक गिरीश प्रभुणे, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. छगनभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष प्रा. सारंग जोशी, प्रदेशमंत्री सिद्धेश्‍वर लटपटे, सुधीर मेहता, महानगर अध्यक्षा प्रा. शिल्पा जोशी, महानगरमंत्री प्रथमेश रत्नपारखी आदी उपस्थित होते. अभाविपच्या अधिवेशनाची सुरुवात ध्वजवंदन करून झाली. प्रदेश मंत्री सिद्धेश्‍वर लटपटे यांनी गेल्या वर्षाचा आढावा मांडला.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जावडेकर म्हणाले, "देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. पिक विमा दिला आहे. सतरा हजार कोटी रुपयांचा प्रिमियम शेतकऱ्यांनी दिला, त्या बदल्यात त्यांना नव्वद हजार रुपये दिले आहेत. किसान सन्मान योजनेतून दहा वर्षांसाठी दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याला लाभ दहा कोटी शेतकरी घेत आहेत. सरकारने घर नसणाऱ्यांना घरे दिली. देशाला हागणदारीमुक्त करण्यासाठी दहा कोटी स्वच्छतागृहे बांधली. गरिबांना बॅंक खाते दिले. मुद्रा योजनेतून अर्थसहाय्य दिले. सर्वसामान्यांना 12 रुपये व 320 रुपयांत वर्षभराचा विमा दिला. यातून देश बदलत आहे. ताकदीने उभा राहात आहे. कोविडचा सामना करण्यासाठी जगात एकट्या भारताने दोन व्हॅकसिन निर्माण केल्या आहेत.'' माध्यमांबाबत ते म्हणाले, "अफवा पसरविणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. चुकीच्या बातम्या पसरवू नये. कोणत्याही घटनेची पडताळणी करा, नंतर बातम्या पसरवा. सूचना द्या. त्यांचे स्वागत आहे.'' अभाविपचा कार्यकर्ता असतानाच्या आठवणीही त्यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रभुणे म्हणाले, "विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. चिंचवड त्यावेळी गाव व शहरीकरणाच्या स्थितीत होते. या उपक्रमातूनच उपेक्षितांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानेच समरसता पुनरुत्थान गुरुकुलम्‌मध्ये काम सुरू आहे.'' मोरेश्‍वर शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. 

अधिवेशनातील प्रस्ताव 
- क्‍यूआर कोडच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतीची दखल आणि युनेस्को व लंडनमधील वारकी फाउंडेशनचा ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजीतसिंह दिसले गुरुजी यांचे अभिनंदन 
- कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही. त्यांचे शुल्क परत करावे, डीबीटी शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य भत्ता द्यावा 
- श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलनास पाठिंबा द्यावा 
- कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान व कोविड प्रतिबंधक लस निर्माण करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे अभिनंदन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister prakash javadekar said that oppose anti-national acts at akhil bharatiya vidyarthi parishad chinchwad