
पिंपरी : मास्क न घालणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे यांच्यावर महापालिका कारवाई करीत आहे. पोलिसांच्या मदतीने काल दापोडीत चार तास कारवाई करण्यात आली. त्यावेळी एका भाजी विक्रेत्याने चक्क दीडशे रुपये चिल्लर दिली. एक, दोन, पाच रुपये त्यात होते. तर, मी कोण आहे म्हणत एका अभिनेत्रीने धिंगाणा घातला. असे अनेक किस्से घडले....
किस्सा एक...
भाजी विक्रेता पन्नाशीतील होता. तोंडाला मास्क लावलेला होता. पण, मास्क थोडा खाली घेऊन तो रस्त्याने चालता चालता थुंकला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याने पाहिले आणि दंडाच्या रकमेची मागणी केली. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक घासाघीस झाली. दंड भरावाच लागणार, असे लक्षात आल्यावर त्यांनी हातातील पिशवीतून एक कॅरिबॅग काढली आणि दंडाच्या रकमेसाठी पैसे मोजू लागला. कारण ती सर्व चिल्लर होती. एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये अशी सगळी चिल्लर, भाजी विकून जमा झालेली. एक, दोन, तीन..... असे करत करत दीडशे रुपये मोजले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडे दिले. नाव सांगितले. दंडाची पावती घेतली आणि निघून गेले.
किस्सा दोन...
एका अभिनेत्रीने 'मी कोण आहे' असे म्हणत धिंगाणा घातला. ' मी हिरोईन आहे, दंड भरणार नाही. कारवाई करायची तर माझ्या घरी पावती पाठवून द्या', असे तिने आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकारी यांना सुनावले. मोटारीतून जात असताना तिने मास्क लावलेला नव्हता. त्यामुळे आरोग्य कर्मचारी व पोलिसांनी तिची मोटार थांबवून दंड भरावा लागेल, असे सांगितले होते. त्यावरून तिने थयथयाट केला. एका रंगाशी साधर्म्य असलेले नाव असलेल्या या अभिनेत्रीला, 'आता कोर्टात या. दंड भरा' असे सुनावले. व 'ये या गाडीचा नंबर घ्या. दोघांनी त्यांच्या घरी जाऊन गाडीचे आरसी बुक चेक करा', असे पोलिस अधिकारी दोन पोलिसांना उद्देशून म्हणाले. हे ऐकून, 'भरला मी दंड, काही नका येऊ घरी' असे म्हणून अभिनेत्री तावातावाने निघून गेली.
किस्सा तीन...
मुंबई पोलिस दलातील एक हवालदार व महापालिका आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याने सुद्धा मास्क लावलेला नव्हता. त्यांच्याकडून दंड वसूल केला. त्यांनीही निमुटपणे दंड भरला व चांगली कारवाई आहे, त्या शिवाय लोक सुधारणार नाहीत, असे म्हणून स्वत:ची ओळख दिली.
किस्सा चार...
आई व मुलगा... दोघेही अलिशान मोटारीतून जात होते. आईने तोंडाला मास्क लावलेला होता. मुलाने बेपर्वाई केली. पोलिसांनी मोटार थांबवली. दोघेही खाली उतरले. रुबाबात म्हणाले, "काय झाले?' पोलिस म्हणाले, "तोंडाला मास्क नाही, दंड भरा'. आईने राजकीय घराण्याचा उल्लेख करीत दंड भरण्यास विरोध विरोध केला. मुलाने सहायक पोलिस निरीक्षक व महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना अरेरावाची भाषा वापरली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अखेर मुलाला पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. "मी मुलाला एकटे का सोडू' म्हणत आईनेही पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी काही एक न ऐकता भारतीय दंड संहितेनुसार कारवाई सुरू केली. अखेर पाचशे रुपये दंड भरून मायलेक निघून गेले. दुपारी एकच्या सुमारास दापोडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरू झालेला माय लेकराचा दंडाचा किस्सा संध्याकाळी पाचच्या सुमारास दापोडी पोलिस चौकीत सुटला. त्यांना दंडाची रक्कम भरावीच लागली.
किस्सा पाच...
"अहो साहेब, मी तोंडाला रुमाल बांधलेला होता. हा बघा, अजूनही गळ्यातच आहे. पण, घाम आला म्हणून रुमाल बाजूला करून घाम पुसला. तेव्हढ्यात तुमच्या माणसांनी पाहिले. कसा काय दंड भरू.'' थ्री-फोर पॅंट व टी शर्ट अंगात असलेली व्यक्त दंडाची पावती फाडणाऱ्या कर्मचाऱ्याला सांगत होती. कर्मचारी म्हणाला, ""हे बघा साहेब, आमचा माणूस काय? खोटा बोलणार आहे. का? तुमचा मास्क नसेल म्हणून त्यांनी तुम्हाला थांबवल ना! द्या दंडाचे पैसे द्या. पावती घ्या.'' त्यावर "तुमची कारवाई योग्यच आहे. हे व्हायलाच पाहिजे. पण, माझं तरी किमान ऐकूण घ्या,' असे त्या व्यक्तीने सूचविले. त्यावर कर्मचाऱ्याने दंड आकारण्याचा हट्ट कायम ठेवला आणि संबंधित व्यक्तीनेही दंडाचे पैसे दिले व पुढे चालत गेले.
कारवाई का केली?
महापालिका ह क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग आणि भोसरी पोलिस ठाण्यांतर्गत दापोडी पोलिस चौकी यांच्या संयुक्त पथकांनी दापोडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भगतसिंग शाळेजवळ बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कारवाई सुरू केली. दापोडीतील सिद्धार्थनगर, गुलाबनगर, न्यू गुलाबनगर, अत्तार विटभट्टी, काटे चाळ आदी भागात सर्वाधिक कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. शिवाय, येथील मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे कारवाई करण्यात आली. आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चार पथके होती. त्यांच्या जोडीला सहायक पोलिस निरीक्षकांचे पथक तैनात होते.
कारवाई कोणावर केली...
पादचारी असो वा दुचाकीस्वार, रिक्षावाला असो वा मोटारवाला सर्वांना दंड भरावा लागला. एका रिक्षाचालकाकडे मास्क नव्हता. शिवाय त्यानेही अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे अंगातील टी शर्ट काढून त्याला तोंडाला बांधायला लावले व दंड न भरल्यामुळे पुढील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी त्याला पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले.
कारवाई कोणी केली...
महापालिका ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दापोडीत मास्क न वापरल्याबाबत व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबत आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, संजय मानमोडे, धनश्री जगदाळे, रश्मी तुंडलावर व भोसरीचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बनसोडे यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली.
इतका वसूल झाला दंड...
दापोडीत एकूण 97 नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे बाबत रक्कम रुपये 14 हजार 550 व मास्क न वापरले बाबत एकूण 56 नागरिकांना एकूण रुपये 24 हजार असा एकूण 42 हजार 550 रुपये दंड आकारण्यात आला.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.