पिंपरी-चिंचवडमध्ये पावसामुळे खोदकामांचा 'राडा'

पीतांबर लोहार
Monday, 12 October 2020

 • नागरिकांची गैरसोय
 • चिखलाच्या रस्त्यातून काढावा लागतोय मार्ग 

पिंपरी : मॉन्सून थांबल्यामुळे गेल्या महिन्यांपासून शहरातील विकासकामे सुरू झाली. विविध वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसह अर्धवट कामेही पूर्ण करायला प्राधान्य दिले जाऊ लागले. त्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याची खोदाई केली आहे. मात्र, सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीचा जोरदार पावसाने खोदकामांच्या ठिकाणी चिखल होऊन नागरिकांची गैरसोय होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जलवाहिन्या व सांडपाणी वाहिन्या देखभाल-दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती, कोरोनामुळे रखडलेले नवीन रस्ते, अर्बन स्ट्रिट रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, पावसाळी गटारे, स्मार्ट सिटी अंतर्गत कामे, इंटरनेट वाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. कोरोनामुळे रखडलेली निगडीतील भक्ती-शक्ती उड्डाणपूल, बिजलीनगर भुयारी मार्ग, सुदर्शननगर पिंपळे गुरव भुयारी मार्ग, चऱ्होलीतील रस्ता रुंदीकरण, नवी सांगवीतील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, अशा कामांना गती मिळाली आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी खोदकामे केली आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे खोदलेल्या ठिकाणी चिखली होऊन राडारोडा रस्त्यावर पसरत आहे. त्याचा स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनाही त्रास होत आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा

नागरिक म्हणतात... 

प्रमोद सोनवणे (कामगार) : बुर्डे वस्ती- चऱ्होली, निरगुडीमार्गे मी कामावर जात असतो. पण, रस्त्याचे काम चालू असल्याने चिखल झाला आहे. शिवाय, मोठे डंपर सारखे ये-जा करीत असतात. खोदकामामुळे रस्ता अरुंद झाल्याने मोटारसायकल घसरण्याची भीती वाटते. 

कयूम शेख (व्यापारी) : नेहरूनगर येथील झिरो बॉईज चौकात रस्ता खोदल्याने एकाच मार्गाने वाहतूक सुरू होती. या रस्त्यावर एका बाजूला वाहने उभी होती. एका बोळातून एक मुलगा छोटी सायकल घेऊन माझ्या गाडीसमोरच आला. सुदैवाने माझ्या लक्षात आल्याने गाडी थांबवली. 

ए. के. कुलकर्णी (नोकरदार) : लिंक रस्त्यावर फूटपाथची कामे सुरू आहेत. पण, त्यासाठी लागणारे कॉंक्रिटचे गट्टू सोसायट्यांच्या प्रवेशद्वारासमोरच टाकले आहेत. रस्ता व सोसायट्यांच्या आवारापेक्षा पदपथ उंच होत आहे. शिवाय, पावसामुळे चिखल होत असल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इथे सुरू आहेत कामे 

 • निरगुडी रस्ता, बुर्डेवस्ती, चऱ्होली : कॉंक्रिटीकरणासाठी खोदकाम 
 • चऱ्होली गावठाण : मुख्य चौकात कॉंक्रिटीकरण, मंडईकडून वळण रस्ता 
 • झिरो बॉईज चौक, नेहरूनगर : सेवा वाहिन्यांसाठी खोदकाम 
 • केएसबी चौक - कुदळवाडी बीआरटी रस्ता : सेवा वाहिन्या टाकल्यानंतर फक्त खडीकरण 
 • पूर्णानगर : पदपथाचे काम, पेव्हिंग ब्लॉक विखुरलेले तसेच, दुरुस्तीसाठी खोदकामही 
 • भक्ती-शक्ती चौक, निगडी : उड्डाणपुलाचे काम, रॅम्पसाठी खडी, मुरुम टाकलेला 
 • डांगे चौक, थेरगाव : भुयारी मार्गाचे काम सुरू 
 • काटेपूरम चौक, नवी सांगवी : कॉंक्रिटीकरणासाठी खोदकाम 
 • जाधववाडी, कुदळवाडी, चिखली : अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू 
 • रावेत रस्ता, वाल्हेकरवाडी : रस्त्याचे कॉंक्रिटीकरण संथगतीने 
 • लिंकरोड चिंचवड : अर्बन स्ट्रिट अंतर्गत कामाचे साहित्य रस्त्यात, नागरिकांची गैरसोय 
 • इंद्रायणीनगर, भोसरी : रस्ता दुभाजक दुरुस्तीचे काम 
 • राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली भोसरी : अर्बन स्ट्रिट नुसार सुशोभिकरण 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mud at the excavation site due to rain in pimpri chinchwad city