esakal | टेरेसवरून फेकून तरुणाचा खून; पिंपरीतील घटना

बोलून बातमी शोधा

टेरेसवरून फेकून तरुणाचा खून; पिंपरीतील घटना

सतरा जणांवर गुन्हा दाखल

टेरेसवरून फेकून तरुणाचा खून; पिंपरीतील घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : वीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून इमारतीच्या टेरेसवरुन फेकून खून केल्याची घटना पिंपरीगावात घडली असून, याप्रकरणी सतरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अक्षय अनिल काशीद (वय २०, रा. पवार नगर, गल्ली क्रमांक ३, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णा बाळू पारधे ऊर्फ बॉक्सर, बाळ्या, तौसीफ, सचिन सौदाई, अजय टाक, जतीन मेवानी, अनिल पिवाल, कपिल टाक, तरुण टाक, आतिश ननावरे, जय पिवाल, विनय बेद, सद्दाम शेख, खलिल शेख, अरुण टाक, जतिन टाक, खुबचंद मंगतानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. ३०) पहाटे तीनच्या सुमारास फिर्यादी महिला घरात पती व मुलीसह झोपले होते.

हेही वाचा: Corona : मावळातील कळकराई निम्मी पॉझिटिव्ह!

मागील बेडरुममध्ये फिर्यादी यांच्या मामाचा मुलगा कृष्णा बाळू पारधे व त्याची पत्नी झोपले होते. फ्लॅटचा समोरील दरवाजा कोणीतरी वाजवल्याने फिर्यादीने दरवाजा उघडला तेव्हा अक्षय काशीद दरवाजात उभा होता. अक्षयने फिर्यादी यांना बेडरुमसमोर कोणाच्या चपल्या आहेत, असे विचारत त्यांना बाहेर बोलविण्यास सांगितले व फिर्यादीला शिवीगाळ केली. हा आरडाओरडा ऐकून कृष्णा बाहेर आला‌. त्याने अक्षयला ‘तू कोण आहेस व तू इथे काय करतोस’, अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीने हा अक्षय असून, माझ्या सोबत लग्न करणार आहे. तू त्याला काही बोलू नकोस’, असे सांगितले.

हेही वाचा: लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन; लोणावळा पोलिसांकडून कारवाई

दरम्यान, आरोपी कृष्णाने अक्षयला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर कृष्णा त्याच्या पत्नीला सोडविण्यासाठी घरी गेला व सोबत इतर साथीदारांना घेऊन आला. तेथे आलेल्या आरोपींनी अक्षयला मारहाण केली. अक्षय जीव वाचविण्यासाठी जोरजोरात आरडाओरडा करीत जिन्यावरून खाली पळत असताना अपार्टमेंन्टमधील लोक घराबाहेर आले. त्यावेळी आरोपींनी हातातील लाकडी दांडके उंचावून ‘आमच्यामध्ये कुणी पडले तर त्याला जीवंत सोडणार नाही, आम्ही खुबचंद मंगतानीची माणसे आहोत’, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी अक्षयला मारहाण करीत इमारतीच्या टेरेसवरुन खाली फेकून देत तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.