पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडूनही उमेदवार रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

  • उपमहापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणार 

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी भाजपने उपमहापौरपदासाठी केशव घोळवे यांना तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसने निकिता कदम यांना उमेदवारी दिली. या पदासाठी शुक्रवारी (ता. 6) सकाळी अकरा वाजता विशेष सभा होणार असून, त्यात निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. एका नगरसेवकाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे संख्याबळ 76 झाली आहे. शिवाय, अपक्ष चार नगरसेवकांचाही त्यांना पाठिंबा आहे. विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याही दोन नगरसेवकांचा मृत्यू झालेला असल्याने त्यांचे संख्याबळ 34 वर आले आहे. त्यांना शिवसेनेच्या नऊ, मनसे व अपक्ष प्रत्येकी एक अशा 11 नगरसेवकांचा पाठिंबा मिळू शकतो. तसेच, भाजपमधील मतभेदामुळे नाराज असलेल्या काही नगरसेवकांची साथ मिळू शकते, असा अंदाज राष्ट्रवादीला आहे. त्यामुळे त्यांनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ आदी उपस्थित होते. तर, घोळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ पवार आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

दरम्यान, पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार तुषार हिंगे यांनी 14 ऑक्‍टोबर रोजी उमहापौरपदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेसाठीची निवडणूक शुक्रवारी होणार आहे. गेल्या वर्षी 22 नोव्हेंबर रोजी हिंगे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या विरोधात उतरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राजू बनसोडे यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. आताही राष्ट्रवादी माघार घेणार की मतदान प्रक्रिया पूर्ण होणार, याची उत्सुकता वाढली आहे. कदम यांनी माघार घेतल्यास घोळवे यांची बिनविरोध निवड होईल. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीनंतर भाजपने शैलजा मोरे, सचिन चिंचवडे, तुषार हिंगे यांना उपमहापौरपदाची संधी दिली आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP is also in the fray for the post of Deputy Mayor of Pimpri-Chinchwad