Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो, लॉकडाउनचे हे नविन आदेश जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

आज मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुधारित आदेश काढला

पिंपरी : आज मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुधारित आदेश काढला. त्यानुसार पेट्रोल व गॅस पंपांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा राहील. मात्र, केवळ सरकारी वाहने, अत्यावश्‍यक सेवा आणि पुरवठा साखळीतील वाहनांनाच इंधन मिळणार आहे. तसेच, कंपन्या सुरू राहणार असून कामगारांना स्वतःच्या वाहनाने ये-जा करता येणार आहे. त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना पास देऊन त्याची माहिती पोलिस ठाण्यांना द्यायची आहे. यामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. 

लॉकडाउन काळात पिंपरी-चिंचवडमध्ये काय सुरू, काय बंद? वाचा सविस्तर

आयटी कंपन्यांसाठी हे आहेत लॉकडाउनचे नियम

पुणे शहर व जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरात आज मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाउन राहणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी रविवारी रात्री आदेश काढला होता. त्यातील काही अटी व शर्ती बदलून आज दुपारी नवीन आदेश काढला. त्यानुसार, कामगारांना कामावर जाण्यासाठी कंपनीतील मनुष्यबळ विभागाकडून (एचआर) पत्र घ्यावे लागेल. तसेच, कंपनीचे ओळखपत्र जवळ बाळगावे लागेल. पोलिसांनी अडविल्यास पास व कंपनीचे ओळखपत्र दाखवायचे आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरू ठेवता येणार आहे. शक्‍य असल्यास त्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, आयटी कर्मचाऱ्यांसुद्धा कंपनीने दिलेला पास व ओळखपत्र जवळ ठेवावे लागणार आहे. पोलिसांनी अडविल्यास ते दाखवून पुढील प्रवास करावा लागणार आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगांनासुद्धा हाच नियम लागू आहे. 

लॉकडाउन कालावधीत कंपनीत कामावर असलेल्या कामगाराला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या उपचारासह अन्य कामगारांच्या तपासणीचा खर्च कंपनी व्यवस्थापनाला करावा लागणार आहे. तसेच, संपूर्ण कंपनी व परिसराचे निर्जुंतकीकरणाची गरज आहे. 

महापालिकेने यापूर्वी दिलेले पास रद्द करण्यात आले आहेत. शहरांतर्गत सेवांकरीताचे पास epass.addl2@pcmcindia.gov.in या वेबसाईटवरून घेता येईल. आदेशाचे पालन न करण्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. 

Edited by : Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new orders of lockdown for pimpri chinchwad