पिंपरीत पोलिसांची डोकेदुखी वाढली, कारण...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीत नव्या चोरांचा शिरकाव.

पिंपरी : लॉकडाउनमुळे कमी झालेला शहरातील गुन्ह्यांचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. यामध्ये घरफोडीसह चोरीच्या घटनांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येते. सध्या दाखल होत असलेल्या काही घटनांमधील चोरीच्या पद्धतीवरून या चोऱ्या सराईत चोरट्यांऐवजी नवख्या चोरट्यांकडून झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सराईत चोरटा व त्याची चोरीची पद्धत पोलिसांनाही माहित असल्याने चोरट्यांचा शोध घेतानाही कठीण होत नाही. मात्र, आरोपीच नवीन असल्याने त्यांचा शोध घेताना पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. काही घटनांमध्ये किरकोळ किंमतीच्या वस्तूंसह, खाद्यपदार्थांसारख्या वस्तूही चोरीला गेल्याचे समोर येत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

कोरोनामुळे मार्च महिन्याच्या अखेरीला सर्वत्र लॉकडाउन लागू झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. अनेकांचे कामधंदे गेल्याने उपासमारीची वेळ आली. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे तर मोठे हाल झाले. दरम्यान, सध्या लॉकडाउनच्या नियमांत शिथिलता आणली जात असली तरी सर्वच परिस्थिती अद्यापही पूर्ववत झालेली नाही. अनेकांच्या हाताला काम नाही. या परिस्थितीमुळे गुन्हेगारी वाढीस लागू शकते, अशी भिती अगोदरपासूनच व्यक्त केली जात होती. दरम्यान, सध्या शहरात घडत असलेल्या काही घरफोडी, चोऱ्या या घटना सराईत चोरट्यांऐवजी नवख्या चोरट्यांकडून केल्या जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासूनच तर आयुक्तालयाच्या सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटनांमध्ये अधिकच वाढ झाली आहे. किरकोळ किंमतीच्या जीवनावश्‍यक वस्तू चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. 

चोरटा नवखा असल्याचे होते स्पष्ट- सराईत चोरट्यांना चोरी करण्याची पद्धत माहित असते. चोरी करण्याच्या ठिकाणची पाहणी करून किंमती वस्तूंवर त्यांचा डोळा असतो. कुलूप तोडण्यासून ते पळून जाण्यापर्यंतचा सर्व "प्लॅन' केलेला असतो. कोणाच्या तावडीत सापडणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाते. मात्र, नवखा चोरटा गोंधळून जातो. त्यामुळे घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करताच चोरटा नवखा असल्याचे स्पष्ट होते.  

जीवनावश्‍यक वस्तू चोरीला- सध्या चोरीचे स्वरुप देखील बदलल्याचे दिसून येत आहे. लॉकडाउनमुळे किंमती वस्तूंऐवजी चोरट्यांनी अक्षरश: किरकोळ किंमतीच्या खाद्यपदार्थांचीही चोरी केल्याचे समोर येत आहे. जांबे येथे 22 ऑगस्टला घडलेल्या घटनेत चोरट्यांनी मेडिकल दुकानाचे शटर उचकटून बिस्किट पुडे, दूध, चॉकलेट चोरले. तर पिंपरी येथे मागील आठवड्यात भाजीचे दुकान फोडून ऐवज लंपास केला. यासह वाकड येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी हॉटेल फोडून स्टीलचे काऊंटर तर कपड्यांचे दुकान फोडून कपडे चोरल्याच्या घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आल्या. 

आणखी वाचा - शरद पवार म्हणाले, काळजी करू नका; मी तुमच्या पाठिशी

घटना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै 
घरफोडी 35 28 23 9 7 16 14 
वाहनचोरी 107 92 64 8 29 57 57 
इतर चोरी 72 52 34 4 12 20 15 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New thieves infiltrate Pimpri Chinchwad industrial city