Video : आता गिरण्याही 'हाउसफुल', दळणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

Video : आता गिरण्याही 'हाउसफुल', दळणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

पिंपरी : पाच दिवसांच्या कडक लॉकडाउनमुळे पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी चक्क पिठाच्या गिरणीत रांगा लागल्या आहेत. काही जण रांगेत उभे न राहता धान्याच्या पिशव्या गिरणीत ठेवून दळणासाठी नंबर लावत आहेत. ही गर्दी रविवारी (ता. 11) सकाळपासून वाढल्याने गिरणी परिसरात गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

शहरात जवळपास हजारोंच्यावर गिरणी आहेत. एका परिसरात दोन ते तीन गिरण्या आहेत. काही ठिकाणी घरगुती गिरणी आहेत. मात्र, वीजबीलही जास्त येत असल्याने काहींनी गिरणीतूनच दळण आणणे पसंत केले. दळणासाठी सहा रुपये दर सध्या किलोमागे सुरू आहे. मोठ्या पिठाच्या गिरणीत नागरिक उभे राहूनच दळण घेऊन जात असल्याने गर्दी होत आहे. गहू, बाजरी, ज्वारीसह काहींनी तांदूळ, डाळ, कडधान्ये ही दळणासाठी दिली आहेत. काही नागरिकांनी महिनाभराचे पीठ दळून घेतले आहे.

मात्र, काही नागरिक दोन ते तीन महिने पुरेल एवढे धान्य दळून नेताना नजरेस पडले. या नागरिकांना पुढे देखील लॉकडाउन वाढेल, की काय याची भीती सतावताना दिसली. तर काहीजण 'घरात पीठच नाही, दळून लवकर द्या', अशी विनवणी गिरणी चालकाकडे करत होते. मात्र, घरात पीठ शिल्लक असूनही अतिरिक्त पीठ असावे, असे बहाद्दरही दळणासाठी गिरणीत आले होते. एकाच वेळी दिवसभरात जवळपास तीनशे ते चारशे पिशव्या दळणासाठी एका गिरणीत येऊन पडल्या होत्या. त्यामुळे त्या पिशव्या व डब्यांमुळे गिरणीचा परिसर फुलून गेला होता.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एका पिठाच्या गिरणीत दोन ते तीन मोठ्या गिरण्या असूनही चालकाला दळण ओव्हरलोड झाले होते. सकाळी 10 ते 5 यावेळेतच गिरण्या सुरू राहत असल्याने नागरिकांची झुंबड उडाली. दुपारी एक तास गिरणी बंद असल्याने दुपारी तीननंतर नागरिक गिरणीत गर्दी करताना दिसत आहेत. काही जण ताटकळत उभे राहत आहेत. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

ग्राहक सुरेंद्र वाघमारे म्हणाले, "गिरणी हा घटक जीवनावश्‍यक सेवेत असायला हवा. नागरिक सोशल मीडियाच्या अफवांवर विश्‍वास ठेवत आहेत. शासन नियमावली स्पष्ट हवी. नागरिकांचा गोंधळ उडत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही."

गर्दी करू नका. तोंडाला मास्क लावा. सॅनिटायजर लावूनच गिरणीत या. तसेच, सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे सांगूनही नागरिक गिरणी परिसरात गर्दी करीत आहेत. काही जण तर दळून लगेच हवे, असे अट्टहास करून तिथेच उभे राहत आहेत. मात्र, काही चालक दळून झाल्यानंतर फोन करून पीठ घेण्यासाठी येतात.
- विलास लांडे, गिरणी मालक, कासारवाडी

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com