काय सांगता? नर्सरी, सिनिअर केजीचेही ऑनलाइन क्लास सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सरकारने तिसऱ्या वर्गापुढील ऑनलाइन क्लास सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या सूचनेला केराची टोपली दाखवीत अनेक घरगुती शाळांनी प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजीचे ऑनलाइन क्लास सुरू केले आहेत.

पिंपरी : सरकारने तिसऱ्या वर्गापुढील ऑनलाइन क्लास सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या सूचनेला केराची टोपली दाखवीत अनेक घरगुती शाळांनी प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजीचे ऑनलाइन क्लास सुरू केले आहेत. अशा शाळांवर कारवाई होईल का, असा प्रश्‍न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

शहरात सुमारे 5 हजार प्ले ग्रुप आणि नर्सरीच्या घरगुती शाळा आहे. अक्षरश: गल्लोगल्ली या शाळांचे पेव फुटले असून, त्यांच्यावर सरकारचा अंकुश नसल्याने एखाद्या फ्लॅट, अपार्टमेंट, खोल्यांमध्ये हे वर्ग भरविण्यात येतात. येथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्या, तरी केवळ पालकांकडे पुरेसा वेळ नसल्याने या शाळांचे फावते असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना महामारीमुळे प्रत्यक्षात शाळा केव्हा सुरू होणार आहे, हे सांगणे कठीण आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 जूनपासून सरकारने ऑनलाइन शाळा सुरू केल्या आहेत. परंतु, तिसरीच्या आतील वर्ग (नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली, दुसरी) ऑनलाइन सुरू करण्यास मनाई केली आहे. या लहान वर्गांना ऑनलाइन शिक्षण शक्‍य नाही. तरीही या शाळांनी गुपचूपपणे नवीन प्रवेश प्रक्रिया राबवून ऑनलाइन वर्गदेखील सुरू केले आहेत. एकेका विद्यार्थ्यांकडून वर्षाला 20 ते 28 हजार शुल्क आकारले जात आहे. शिक्षण विभागाकडेदेखील अशा शाळांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्व प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान अथवा कोणतीही मदत मिळत नसल्याने या शाळांचे आर्थिक नियोजन विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कावरच अवलंबून असल्याने जितके अधिक विद्यार्थी तेवढेच अधिक उत्पन्न, असे या शाळांचे समीकरण बनले आहे. ऑनलाइन शिक्षण प्रणालीतून शाळा त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन जपत असल्या, तरी विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पालकांनाच पूर्ण करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गतवर्षात पालकांसोबत संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून झूम, गुगल मीटसारख्या ऍपच्या लिंक शेअर करून विविध शाळांनी नवीन शैक्षणिक वर्षांचे वर्ग सुरू केले आहे. विद्यार्थ्यांसोबत मोबाईलच्या माध्यमातून संवाद साधत शाळेतील शिक्षक मागील वर्षात विद्यार्थ्यांना शिकविलेल्या अभ्यासक्रमासह विविध प्रकारच्या कार्यानुभवाच्या प्रात्यक्षिकांची उजळणीही करून घेत आहेत. त्यासाठी पालकांना पूर्व सूचना दिली जात असून, पालकांना विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यास सांगितले जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"अनेक प्ले ग्रुप व नर्सरीचे वर्ग सुरू केले आहेत, ज्यांच्या तक्रारी आल्या आहेत, त्यांना नोटीस बजावल्या आहेत. पण पालकांनी तक्रार करणे आवश्‍यक आहे.'' 

- विलास पाटील, तक्रार निवारण अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nursery, Senior KG Online Classes starts