खासगी रुग्णालयांत केवळ २२५ रुग्ण; कोरोना संसर्ग कमी झाल्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

सहा महिन्यांपूर्वी रुग्णांना बेड मिळत नव्हते,अशी स्थिती होती.आता रुग्ण घटल्याने क्वारंटाइन सेंटरसह एक जम्बो फॅसिलिटी रुग्णालय बंद केले असून अन्य रुग्णालयेसुद्धा सर्वसामान्य रुग्णांसाठी खुली केली आहेत

पिंपरी - कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने महापालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमधील संख्यासुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण, सहा महिन्यांपूर्वी रुग्णांना बेड मिळत नव्हते, अशी स्थिती होती. आता रुग्ण घटल्याने क्वारंटाइन सेंटरसह एक जम्बो फॅसिलिटी रुग्णालय बंद केले असून अन्य रुग्णालयेसुद्धा सर्वसामान्य रुग्णांसाठी खुली केली आहेत. सहा महिन्यांपूर्वी खासगी रुग्णालयांत दीड हजारांपर्यंत असलेला रुग्णांचा आकडा आता सव्वादोनशेवर आला आहे. 

जुलै मध्यापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले होते. ‘रुग्णासाठी बेड उपलब्ध आहे का?’ अशी चौकशी करूनच रुग्णांना रुग्णालय व क्वारंटाइन सेंटरला नेली जात होते. महापालिका प्रशासनाने उपचारासाठी १८ ठिकाणी क्वारंटाइन सेंटर सुरू केले होते. खासगी ३९ रुग्णालयांना उपचाराची परवानगी दिली होती. राज्य सरकार व पुणे महागर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मदतीने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर आठशे बेड क्षमतेचे जम्बो फॅसिलिटी रुग्णालय उभारले होते. तसेच, ऑटो क्‍लस्टर येथे स्वतः जम्बो फॅसिलिटी व भोसरी एमआयडीसीत बालनगरी येथे तीनशे खाटांचे क्वारंटाइन सेंटर उभारले होते. शाळा, कॉलेज, वसतिगृह, म्हाडा इमारती व घरकूलमधील इमारतींमध्येही क्वारंटाइन सेंटर सुरू केले होते. मात्र, आता संसर्ग कमी झाला असून रुग्णसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालय पूर्ण क्षमतेने अन्य रुग्णांसाठी खुले केले आहे. मगर स्टेडियम जम्बो रुग्णालय, १८ क्वारंटाइन सेंटर बंद केले आहेत. केवळ ऑटो क्‍लस्टर जम्बो रुग्णालय व काही खासगी रुग्णालयात थोडेफार रुग्ण आहेत. रुग्ण होमआयसोलेट आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

आठ रुग्णालये खाली
सध्या खासगी ३३ रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय आहे. त्यातील आठ रुग्णालयांत एकही रुग्ण नाही. १८ रुग्णालयांत दहापेक्षा कमी रुग्ण आहेत. त्यापेक्षा अधिक रुग्ण सात रुग्णालयांत असून, २० पेक्षा जास्त रुग्ण केवळ दोन रुग्णालयांत आहेत. त्यातील एका रुग्णालयात ५१ व दुसऱ्या रुग्णालयात ३४ रुग्ण आहेत. 

प्रेयसीच्या पतीवर प्रियकरानेच केला प्राणघातक हल्ला

नवीन भोसरी रुग्णालय रिकामे
इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना स्ट्रेन रुग्णांच्या उपाचाराची सोय नवीन भोसरी रुग्णालयात महापालिकेने केली होती. तेथील रुग्णांना जम्बो रुग्णालयांत दाखल केले होते. इंग्लंडहून आलेल्या १८८ पैकी सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील तीन रुग्णांचे रिपोर्ट स्ट्रेन पॉझिटीव्ह होते. त्यांचा चौदा दिवसांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या नवीन भोसरी रुग्णालयाय एकही रुग्ण नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 225 patients in private hospitals reduced corona infection