शहरात नेत्रदान प्रक्रिया थंडावली;दहा वर्षांत अवघे ७१२ नेत्रदाते

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 December 2020

शहरातील नेत्रपेढीत ७१२ नेत्रदात्यांची नोंद झाली आहे. शहरातील मृत्यूचे प्रमाण व त्यापश्‍चात होणारे नेत्रदान पाहता जनसामान्यांत जनजागृतीची मोहीम अधिक मोठ्या प्रमाणात व्हावी, असे मत व्यक्त होत आहे.

चिंचवड - दृष्टिहीन व्यक्तींच्या डोळ्यांत दाटलेल्या अंधाराला प्रकाशाचा मार्ग दाखविण्यासाठी नेत्रदान प्रक्रिया महत्त्वाची ठरते. मात्र, जनजागृतीचा अभाव, शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष व कोरोनासारख्या आपत्तीमुळे नेत्रदान प्रक्रिया थंडावली आहे. मागील दशकात शहरातील नेत्रपेढीत ७१२ नेत्रदात्यांची नोंद झाली आहे. शहरातील मृत्यूचे प्रमाण व त्यापश्‍चात होणारे नेत्रदान पाहता जनसामान्यांत जनजागृतीची मोहीम अधिक मोठ्या प्रमाणात व्हावी, असे मत व्यक्त होत आहे.

महापालिका व आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नोव्हेंबर २०१० मध्ये ‘पिंपरी-चिंचवड आदित्य ज्योत नेत्रपेढी’ सुरू करण्यात आली. सामाजिक संस्था व सेवाभावी कार्यकर्त्यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली. मृत्यूचे प्रमाण व या नंतर होणारे नेत्रदान यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. मात्र, तांत्रिक अडचणी, प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष व नागरिकांमध्ये असणारे गैरसमज यामुळे नेत्रदान प्रक्रिया प्रभावी ठरली  नाही.

हेही वाचा : पाण्यासाठी आणखी किती पैसे मोजायचे?

गेल्या दहा वर्षात ७१२ नेत्रदाते मिळाले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून नेत्रदान प्रक्रिया थंडावली आहे. या वर्षात फक्त ३८ जणांचे नेत्रदान झाले आहे. 

आधुनिक सोयी-सुविधा
सध्या नेत्रपेढींचे कार्य ऑनलाइन सुरू आहे. नेत्रदान प्रक्रियेनंतर मिळणारे बुबुळ योग्य रुग्णाला उपयोगी यावे या साठी ही प्रक्रिया उत्तम आहे. अंधत्व नियंत्रण अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २३० नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नेत्रसंकलनाचे कार्य केले जाते. समाजात नेत्रदानाविषयी जनजागृती करून नेत्रसंकलन करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जातात. या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमुळे राज्यात मागील वर्षात सात हजार नेत्रसंकलनाचा टप्पा गाठला आहे.

Coronavirus: नव्या कोरोना रुग्णांसाठी भोसरी रुग्णालय

आईच्या निधनानंतर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात आई नसली तरी नेत्ररूपी कोणाच्या तरी दृष्टीतून आमच्याकडे पाहते आहे, अशी आमची भावना आहे. यासाठी घरातील व्यक्तीचे नेत्रदान करून घेणे ही परिवाराची जबाबदारी आहे. नेत्रदान प्रक्रिया अगदी सुलभ व  सोपी आहे.
- प्रकाश लोखंडे, चिंचवड

‘‘नेत्रदानाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. मृत व्यक्तीने नेत्रदानाचा फॉर्म भरलेला नसला, तरीही घरच्यांच्या संमतीने नेत्रदान करता येते. पाच वर्षांच्या पुढील सर्व निरोगी व्यक्तीचे नेत्रदान करता येते. यासाठी सामाजिक संस्था व संघटनांनी पुढाकार घेऊन जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.
- विश्वास काशीद, प्रेरणा असोसिएशन फॉर दी ब्लाइंड

बुबुळ तयार करणारे कोणतेही वैद्यकीय शास्त्र अद्याप नाही. यासाठी मृत्यूनंतर नेत्रदान करणे हा पर्याय उपलब्ध आहे. अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत योजना राबविल्या जातात. कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह असलेल्या मृत व्यक्तीचे नेत्रदान करता येते. याबाबत गैरसमज करण्याची गरज नाही. पुढाकार घ्यायला हवा.
- डॉ. मदन देशपांडे,  एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल

नोव्हेंबर २०१० ते डिसेंबर २०१० 
२०११ :     ५० 
 २०१२ :    ८८
 २०१३ :    ८३
२०१४ :     ८३
 २०१५:     ८४
२०१६ :     ८४
 २०१७ :     ९४
 २०१८ :     ३५
 २०१९:     ६८
२०२० :    ३८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 712 eye donors in ten years in the pcmc city