Organ Donation : चौदा वर्षांच्या ब्रेनडेड मुलाचे अवयवदान; सात जणांना मिळाली संजीवनी

‘अक्षत’चे अक्षय्य दान; दुःखातही समाजभान
Akshat Lohade
Akshat Lohadesakal

पिंपरी - आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानादेखील समाजभान राखत आपल्या ब्रेनडेड मुलाचे अवयवदान करण्याचा निर्णय शाहूनगर येथील लोहाडे दांपत्याने घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे एक- दोन नाही तर तब्बल सात जणांना अवयव प्रत्यारोपाच्या माध्यमातून जीवनदान मिळाले.

शाहूनगर येथे राहणारा अक्षत लोहाडे (वय- १४) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा २५ ऑगस्टला अपघात झाला होता. गंभीर जखमी झालेल्या अक्षतला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता.

डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून देखील उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने २९ ऑगस्ट रोजी त्याला मेंदू मृत घोषित करण्यात आला आणि लोहाडे परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, यातूनही सावरत त्यांनी अक्षतचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

१ सप्टेंबरला अवयवदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. अक्षत जरी आता त्यांच्यात नसला तरी अवयवदानाने तो इतरांच्या शरीरात जिवंत आहे. अक्षत आता या जगात नाही. मात्र, त्याने दान केलेल्या अवयवांमुळे सात जणांना जीवनदान मिळाले आहे, अशी भावना त्याचे वडील सचिन लोहाडे यांनी व्यक्त केली.

तो परत आलाच नाही...

२५ ऑगस्टला सायंकाळी पाचच्या सुमारास अक्षत घरात असताना त्याचा मित्र नवीन दुचाकी घेऊन आला. त्याच्यासोबत गेलेला अक्षत परत आलाच नाही. त्याच्या परिवारातील आई (सुवर्णा लोहाडे), वडील (सचिन लोहाडे) व मोठी बहीण (विधी लोहाडे) अजूनही या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. मित्राबरोबर बाहेर गेला व अवघ्या पाचच मिनिटात त्याचा अपघात झाल्याची बातमी आल्याचे सचिन लोहाडे यांनी सांगितले.

रुग्णालयात बांधली राखी

अक्षतची बहीण विधी ही वैद्यकीय शिक्षण घेत आहे. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही तो वाचणार नाही, हे लोहाडे कुटुंबीयांच्या लक्षात आले, त्या वेळी विधी हिने अतिदक्षता विभागात असलेल्या अक्षतला राखी बांधून आपल्या भावासोबत शेवटची राखीपौर्णिमा साजरी केली. दुसऱ्याच दिवशी त्याला मेंदू मृत घोषित करण्यात आले. हा प्रसंग उपस्थितांचे हृदय हेलावून टाकणारा होता, असे त्याचे नातेवाईक जितेंद्र छाबडा यांनी सांगितले.

मोठी जखम झाल्याने अक्षतचा मेंदू मृत घोषित करण्यात आला. मात्र, त्याचे इतर अवयव सुदृढ होते. त्या अवयवांमुळे इतर रुग्णांना निरोगी आरोग्य मिळू शकते. ही बाब त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी लगेचच अवयवदानाला मान्यता दिली. हा निर्णय घेण्यास मोठी हिंमत लागते. ती त्यांनी दाखवली.

- डॉ. अमित कुमार पांडे, मेंदू विकारतज्ज्ञ

अक्षतचे अवयव दान होऊ शकतात, याची कल्पना आम्हाला डॉक्टरांनी दिल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. आज अक्षत आमच्यात नाही; पण त्याने केलेल्या अवयवदानामुळे अनेकांचे आयुष्य वाचले आहे, याचे समाधान आहे.

- सचिन लोहाडे, अक्षतचे वडील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com