esakal | पवना जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू होणार 
sakal

बोलून बातमी शोधा

पवना जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू होणार 
 • पूर्वीच्याच सल्लागाराची नियुक्ती; महापालिका स्थायी समितीसमोर प्रस्ताव 

पवना जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू होणार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेल्या पवना जलवाहिनी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्याबाबत सरकारस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागानेही तयार सुरू केली असून, सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्याच ठेकेदाराने प्रकल्पाचे काम करण्यास काही अटी व शर्तींवर तयारी दर्शवली असून, पूर्वीच्याच सल्लागाराचीही नियुक्ती अहवाल तयार करण्यासाठी केली जाणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

पिंपरी-चिंचवडकरांनो सावधान! थुंकल्यास होणार हजार रुपयांचा दंड 

पवना धरणातून निगडी प्राधिकरण सेक्‍टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाइपलाइनद्वारे पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी अठराशे मिलिमीटर व्यासाच्या दोन समांतर जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. संयुक्त भागीदारीत ठेकेदार नियुक्त केला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी विरोध करीत ऑगस्ट 2011 मध्ये आंदोलन केले होते. त्या वेळी झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून काम बंद आहे. आता काम पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या दालनात गेल्या महिन्यात बैठक झाली. त्याला ठेकेदार प्रतिनिधी महेश पाठक, आमदार महेश लांडगे उपस्थित होते. 

ऑगस्टच्या बैठकीत काय ठरले? 
- पुरवठा केलेले पाइप, पंप्स व व्हॉल्वची गुणवत्ता तपासणे 
- यापूर्वी टाकलेल्या पाइपची सद्यःस्थिती व गुणवत्ता तपासणे 
- पवना धरण ते सेक्‍टर 23 पर्यंत ड्रोन सर्वे करून अहवाल करणे 
- कामाचा सुधारित प्रकल्प अहवाल व अर्थसंकल्प तयार करणे 
- कामाचा आराखडा करण्यासाठी सल्लागाराची पुन्हा नेमणूक करणे 

सल्लागार का?... 
- महापालिकेकडे मनुष्यबळ कमी, प्रकल्पासाठी सातत्याने देखरेख स्टाफ लागणार 
- यापूर्वी केलेल्या कामाची 75 कोटींची बिले व अन्य दाव्यांची रक्कम द्यावी लागेल 
- जलवाहिनी मार्गातील अतिक्रमणे, भूसंपादन कामांसाठी परवानग्या घेणे, पाठपुरावा करणे 
- ड्रोनद्वारे सर्वे, खर्चासाठी अर्थसंकल्प, पत्रव्यवहार, रेकॉर्ड ठेवणे, प्रकल्प सादरीकरण 
- ठेकेदाराच्या कामावर गुणनियंत्रण ठेवणे व निलांची अदायगी करणे 

घटनाक्रम 

 • 30 एप्रिल 2008 : कामाचा आदेश 
 • 24 एप्रिल 2010 : कामाची मुदत 24 महिने 
 • 9 ऑगस्ट 2011 : आंदोलन व गोळीबार 
 • 10 ऑगस्ट 2011 : काम बंदचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 
 • 25 मार्च 2019 : ठेकेदाराकडून टर्मिनेशन नोटीस 
 • 31 डिसेंबर 2019 : थेट पाइपलाइन टाकण्याची मुदत पूर्ण 
 • 24 फेब्रुवारी 2020 : कामाबाबत ठेकेदाराकडे पाणीपुरवठा विभागाकडून विचारणा 
 • 25 एप्रिल 2020 : काम सुरू करण्यास ठेकेदाराकडून अटी व शर्तींसह सकारात्मक प्रतिसाद 
 • 11 ऑगस्ट 2020 : कामाबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक 

असा आहे प्रकल्प 

 • एकूण लांबी : 69.69 किलोमीटर 
 • पाइप पुरविले : 34.71 किलोमीटर 

सद्य:स्थिती 

 • महापालिका हद्दीत लांबी : 6.4 किलोमीटर 
 • काम पूर्ण : 4.4 किलोमीटर 
 • दोन समांतर जलवाहिन्या : 8.8 किलोमीटर 
 • जलवाहिन्यांचा व्यास : 1800 मिलिमीटर 

ठेकेदार कंपनी : एनसीसी-एमएमसी-इंदू 
प्रकल्प सल्लागार : युनिटी कन्सलटन्ट (युनिटी आय ई वर्ल्ड)