दत्तक खेळाडूंचे मानधन द्या; कुस्तीगीर संघाची पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्या शहरातील दत्तक खेळाडूंना महापालिकेतर्फे दरमहा मानधन दिले जाते.

पिंपरी : राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्या शहरातील दत्तक खेळाडूंना महापालिकेतर्फे दरमहा मानधन दिले जाते. फेब्रुवारीपासून त्यांचे मानधन बंद आहे. ते पुन्हा सुरू करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुस्तीगीर संघाच्या वतीने आयुक्तांना विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. भारत केसरी पैलवान विजय गावडे, संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे, उपाध्यक्ष महाद्रंग वाघेरे, ज्ञानेश्‍वर कुटे, किशोर नखाते, अजय लांडगे, काळूराम कवितके, राजेश काळभोर, निवृत्ती काळभोर, बाळासाहेब काळजे, केतन खराडे, विनोद गायकवाड आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कुस्तीगीर संघाच्या निवेदनात म्हटले आहे, की राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदक विजेते खेळाडू पिंपरी-चिंचवड शहराचे नावलौकिक करीत आहेत. त्यांना फेब्रुवारी 2020 पासून मानधन दिले जात नाही. ते लवकरात लवकर सुरू करावे. 

सध्या कोरोनामुळे शहरातील सर्व क्रीडांगणे, व्यायामशाळा, खुली मैदाने बंद आहेत. त्यामुळे सर्व प्रकारचे खेळाडू घरीच जमेल, तसा सराव करीत आहेत. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन खेळाडू करीत आहेत. मात्र, त्यांच्या हक्काचे, कष्टाचे मानधन गेल्या नऊ महिन्यांपासून स्थगित आहे. यामुळे खेळाडूंचे आर्थिक नुकसान होत आहे. आपण, सर्व खेळातील दत्तक खेळाडूंना लवकरात लवकर दत्तक शिष्यवृत्ती सुरू करून न्याय मिळवून द्यावा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खेळाडूंना मानधन न मिळाल्यास सर्व खेळाडू, त्यांचे पालक, कुटुंबीय व क्रीडा संघटना न्याय हक्कासाठी आंदोलन करतील, असा इशाराही संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष हनुमंत गावडे यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to pay honorarium to adopted players demands hanumant gawade