पिंपरी : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे रक्तदान आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे रक्तदान आंदोलन

पिंपरी : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे रक्तदान आंदोलन

पिंपरी ः एसटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून वल्लभनगर आगाराच्या प्रवेशद्वारासमोर संप सुरू आहे. या कर्मचाऱ्यांनी कामबंद काळात ‘रक्तदान’ आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाद्वारे ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संपावर असतानाही रक्तदान करून एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण करण्याचा निर्णय संपकऱ्यांनी घेतला. या शिबिरात चालक , वाहक, यांत्रिक अधिकारी आणि प्रवाशांनी आपली समाजाप्रती असलेली जबाबदारी रक्तदान करून पार पाडली. कमी वेतनामुळे एस. टी. कर्मचारी यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच वेगळा आहे. त्यामुळे नेहमीच त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पण कित्येक वेळा एस. टी. कर्मचाऱ्यांनी सामाजिक स्तरावर उल्लेखनीय काम करून त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडविले आहे, असे कर्मचारी कैलास मुळीक व ए. एम. मुल्ला यांनी सांगितले. संपावर असूनही कामगारांनी जीवनातील अतिशय महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या रक्तदान करून पुढाकार घेतल्याचे मेकॅनिक प्रविण मोहिते यांनी नमूद केले.

विजय अडागळे व अरविंद शेंडगे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी राज्यस्तरावर गेल्या १५ दिवसांपासून संप सुरू आहे. वल्लभनगर आगारातील या संपात सहभागी असणाऱ्या ५० कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.’’ आजपर्यंत परिश्रम करून एस.टी. महामंडळाला सांभाळणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या शरीरातील रक्तदान करून एक वेगळा संदेश दिला आहे. आता तरी प्रशासन यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल का ? हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली

एसटी कर्मचाऱ्यांनी रक्ताचे पाणी करून लोकांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान करण्याचा निर्णय घेतला असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. त्याच पद्धतीने शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या, अशी मागणी संपकरी रक्तदात्यांनी केली.

loading image
go to top