पिंपरी कॅम्प : अतिक्रमणांवर कारवाई; व्यापाऱ्यांचा विरोध, ठिय्या आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation in pimpri camp

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे धडक कारवाई पथक गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरी कॅम्पातील मुख्य बाजारपेठेत पोहोचले.

Crime on Encroachment : पिंपरी कॅम्प : अतिक्रमणांवर कारवाई; व्यापाऱ्यांचा विरोध, ठिय्या आंदोलन

पिंपरी - अतिक्रमण निर्मूलन विभागाचे धडक कारवाई पथक गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरी कॅम्पातील मुख्य बाजारपेठेत पोहोचले. रस्त्यावर मांडलेल्या साहित्याची छायाचित्रे घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे साहित्य घेण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. पथकाने साहित्य जप्तची कारवाई मोहिम तीव्र करताच व्यापारी आक्रमक झाले. यातून वादावादीस सुरूवात झाली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून रस्त्यातच ठिय्या आंदोलन केले. शिवाय महापालिकेवर मोर्चा काढला. त्याचे नेतृत्व काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीही केले.

औद्योगिक सुटी असल्याने गुरुवारी बाजारपेठेत गर्दी होती. रस्त्यावर दुकाने थाटून बसलेले, पथारीवाले यांच्यासह दुकानांसमोर रस्त्यावर अतिक्रमण करून मांडलेले साहित्य, वस्तू जप्त करण्याची कारवाई ‘अ’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सुरू केली. त्यावेळी पथकातील अधिकारी, कर्मचारी व व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला. कारवाईला विरोध व महापालिका अधिकाऱ्यांचा निषेध करत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून शगुन चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले. यातून वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला. दरम्यान, ‘सुरक्षा रक्षकांनी लाठीमार केला आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली’, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला. शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना भेटून निवेदन दिले.

बाजारपेठेत कोंडी

पिंपरी कॅम्प ही शहरातील मोठी बाजारपेठ आहे. किरकोळ व घाऊक साहित्याची दुकाने इथे आहेत. मात्र, बहुतांश साहित्य विक्रीसाठी बाहेर ठेवतात. दुकानांसमोरील रस्त्यावर दोन्ही बाजूला पथारीवाले असतात. व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहनेही दुकानासमोरच उभी असतात. त्यामुळे ये-जा करण्यासाठी फारच कमी जागा शिल्लक राहात असल्याने पायी चालणे मुश्कील होते.

पुलाचे काम

पुणे-मुंबई महामार्गावरून कॅम्पात येण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे लोहमार्गावरील इंदिरा गांधी उड्डाणपूल आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.पुलावरून चिंचवड लिंक रस्त्याकडील बाजू रहदारीस बंद केली आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना लिंक रस्त्याला जा-ये करण्यासाठी मुख्य बाजारपेठ व त्या शेजारील रिव्हर रोड हे दोनच मार्ग आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा असणे गरजेचे आहे.

वारंवार कारवाई तरीही...

पिंपरी कॅम्पात अतिक्रमण विरोधी कारवाई वारंवार होत असते. मात्र, कारवाई पथक आले की, वस्तु दुकानात नेल्या जातात. पथारीवाले गायब होतात. आणि पथक पुढे गेले की, पुन्हा जैसे-थे परिस्थिती होते. अतिक्रमणातूनच रस्ता काढत चालावे लागते. काही व्यापाऱ्यांनी इमारतींच्या गॅलरी वाढवलेल्या असून रस्त्यावरील विजेचे दिवे गॅलरीत घेतले आहेत, अशा पद्धतचे अतिक्रमणही इथे बघायला मिळते.

पडद्यामागे ‘अर्थकारण?’

कॅम्पातील प्रत्येक दुकानापुढे पथारीवाले बसून विविध प्रकारच्या वस्तू विकत असतात. त्या बदल्यात संबंधितांना आठ ते दहा हजार रुपये भाडे दिले जाते. या अर्थकारणासाठीच अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध होत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. ‘पैसे दिल्यानंतर पथक कारवाई करत नाही. पैसे न दिल्यास कारवाई केली जाते,’ असा आरोपही व्यापाऱ्यांनी केला.